Kidney Problem : किडनी आपल्या शरीरातील रक्त दिवसभरातून जवळपास 40 वेळा गाळण्याचं काम करते. त्यानंतर विषारी पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढते. त्याशिवाय शरीरातील खनिजाचं संतुलन रेग्यूलेट करण्याचं आणि लाल रक्त पेशींची निर्मिती वाढवणाऱ्या हार्मोन्सना तयार करण्याचं काम किडनी करते. तशी तर किडनी शरीराला अनेक आजारांपासून वाचवते. पण काही कारणांमुळे किडनीही फेल होऊ शकते.
किडनीमध्ये काही समस्या असेल तर शरीर काही संकेत देतं. ज्याकडे वेळीच लक्ष दिलं तर अनेक गंभीर समस्यांपासून बचाव करता येऊ शकतो. किडनीच्या आजारांना चार स्थितींमध्ये विभागण्यात आलं आहे. यात किडनी स्टोन, एक्यूट किडनी इंजरी, क्रॉनिक किडनी डिजीज आणि स्टेज रेनल डिजीज यांचा समावेश आहे. अनेकदा या समस्या जीवघेण्याही ठरू शकतात. अशात या संकेतांना ओळखणं गरजेचं असतं.
दिवसभर थकवा जाणवणे
एनएचएसनुसार, जर तुम्हाला अलिकडे जास्त थकवा जाणवत असेल तर याचं कारण तुमची किडनी योग्यप्रकारे काम करत नसल्याने शरीरात विषारी पदार्थ जमा झाल्या कारणाने होऊ शकतं. विषारी पदार्थ आपल्या शरीरातील इतर जैविक क्रिया प्रभावित करण्याचं काम करतात आणि इतरही अनेक समस्या निर्माण करते.
पुरेशी झोप न घेणं
शरीराला आवश्यक तेवढी झोप घेतली नाही तर अनेक समस्या होतात. तेच किडनीची समस्या हेही याचं एक कारण असू शकतं. स्लीप एपनिया किंवा चांगली झोप येत नसेल तर किडनीमध्ये समस्या आहे असं समजा. अशात जर तुम्हाला सतत चांगली झोप येत नसेल तर लगेच डॉक्टरांना संपर्क साधा.
खाज असलेली त्वचा
कोरडी आणि खाज असलेली त्वचा विनाकारण बराच काळ राहिली तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा. तसेच किडनीसंबंधी टेस्ट करून घ्या. विषारी पदार्थ शरीरात जमा झाल्याने खनिज आणि इतर पोषक तत्वांचं प्रमाण बिघडतं. ज्यामुळे नंतर त्वचा आणि हाडांचं नुकसान होतं.
पायांवर सूज
किडनीमध्ये समस्या असेल तर शरीरातील विषारी पदार्थ पूर्णपणे बाहेर निघत नाहीत. ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. याचप्रमाणे जेव्हा शरीरातून सोडिअमचं अतिरिक्त प्रमाण बाहेर निघत नाही, तेव्हा पायांवर, टाचांवर आणि तळपायांवर सूज येतो. पायांवर सूज येण्याची इतरही आणखी काही कारणे आहेत. पण सल्ला हाच दिला जातो की, पायांवर सूज येत असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.
सूजलेले डोळे
जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूला सूज आलेली दिसत असेल तर लगेच किडनीची टेस्ट करा. ही समस्या सामान्यपणे किडनीतील समस्येमुळे होते. कारण किडनी खराब झाल्यावर प्रोटीन लघवीद्वारे बाहेर निघून जातं.
मांसपेशींमध्ये वेदना
शरीरात जमा असलेल्या विषारी पदार्थांमुळे आणि खनिजांच्या अतिरिक्त प्रमाणामुळे मांसपेशींमध्ये वेदना होऊ शकतात. कारण शरीरातील विषारी पदार्थ पूर्णपणे बाहेर पडत नाहीत. अशात मांसपेशींमधील वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. याने शरीरात अनेक वेगवेगळ्या समस्या वाढू शकतात.
जास्त वेळा लघवी लागणे
अनेकदा लघवीला जास्त जावं लागण्याला किडनीसंबंधी समस्येशी जोडलं जातं. जर गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला जास्त वेळा लघवीला जावं लागत असेल तर उशीर न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
किडनी हेल्दी ठेवण्याचे उपाय
किडनीची समस्या लगेच जाणून घेण्यासाठी नियमितपणे आरोग्याची टेस्ट करा. किडनीच्या समस्येमुळे तुम्हाला एखादा क्रॉनिक आजार होऊ शकतो. त्याशिवाय तुम्ही तुमच्या लाइफस्टाईलमध्ये बदल करू शकता. हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करा, धुम्रपान बंद करा, मद्यसेवन नियंत्रित करा, नियमितपणे व्यायाम करा आणि पेनकिलरचं सेवन कमी करा.