बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून इन्सेफेलाईटीस आजाराचं कहर वाढलेला आहे. एक्यूट इन्सेफेलाईटिस सिंड्रोम (AES) आजाराने आतापर्यंत तब्बल 96 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांत 20 मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
खरं तर हा आजार लिची या फळामुळे होत असल्याचे सांगितले जात आहे. लिची हे फळ उन्हाळ्याच्या शेवटी सर्वत्र मिळू लागते. मात्र हे फळ खाल्ल्याने बिहारमध्ये 96 लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत 179 या तापाचे संदिग्ध रुग्ण आढळले आहेत. या मुलांच्या मृत्यूमागे लिची जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे. रिकाम्या पोटी लिची खाल्ल्याने मुले या रोगाची बळी पडल्याचे सांगण्यात येत आहे. खरं तर या आजाराला अॅक्यूट इंसेफेलाईटीस सिंड्रोम (AES) असं म्हणतात.
अॅक्यूट इंसेफेलाईटीस सिंड्रोम (AES) म्हणजे शरिरातील मुख्य मज्जासंस्थेला प्रभावित करतो. लहान मुलांची मज्जासंस्था कमजोर असल्याने त्यावर जास्त परिणाम होतो. सुरुवातीला जास्त ताप येतो. यानंतर शरीर दुखणे, हालचालीवर परिणाम, मानसिक अस्वास्थता, बेशुद्ध होणे, आकडी येणे, भीती, कोमामध्ये जाणे अशी लक्षणे दिसतात. वेळेवर उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू होतो. हा आजार जून ते ऑक्टोबर दरम्यान बळावतो.
हायपोग्लाइसीमिया म्हणजेच लो-ब्लड शुगर खरे कारण
अक्यूट इंसेफेलाइटिस हा आजार नाही तर सिंड्रोम आहे. कारण हा व्हायरस, बॅक्टेरिया किंवा अन्य कोणत्यातरी कारणामुळे होतो. बिहारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार 54 पैकी 80 टक्के मृत्यू हे हायपोग्लाइसीमिया झाल्याचा संशय आहे. सायंकाळी जेवण न केल्याने रात्री हायपोग्लाइसीमिया किंवा लो ब्लड शुगरची समस्या होऊ शकते. खासकरून त्या मुलांपैकी ज्यांच्या स्नायूंमध्ये ग्लायकोजन-ग्लूकोजची मात्रा कमी असते. ताकद निर्माण करणाऱ्या फॅटी अॅसिडचे रुपांतर ऑक्सीकरणात होते.
लिचीचे कनेक्शन काय?
'द लॅन्सेट' नावाच्या मोडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालामध्ये लिचीचे प्राकृतीक रुप हायपोग्लीसीन ए मध्ये मोडते. यामुळे शरीरात फॅटी अॅसिड बनविण्यास व्यत्यय येतो. यामुळे रक्तशर्करेचे प्रमाण घसरते आणि मेंदूशी संबंधीत आजार वाढू लागतो.
आरोग्य विभागाचा सल्ला, अनोशापोटी खाऊ नका लिची
बिहारच्या मुजफ्फरपूर आणि आजूबाजूच्या परिसरातील गरिब कुटुंबातील मुलं जे आधीपासूनच कुपोषित आहेत, ते रात्रीचं जेवण करू शकत नाहीत. सकाळी नाश्ता करण्याऐवजी अनोशापोटी लिची खातात. त्यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल अचानक कमी होते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनोशापोटी लिची न खाण्याचा सल्ला दिला आहे.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून पोहोचवत असून यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.