(Image Creadit : U-GRO Learning Centres)
झोप सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. एवढचं नव्हे तर, आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यासाठी पूरेशी झोप घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं, असं अनेक संशोधनांमधूनही सिद्ध झालं आहे. मोठ्या माणसांना कमीतकमी आठ तासांची झोप घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांचंदेखील आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांच्या वयानुसार प्रॉपर झोपेची गरज असते. छोटी मुलं आणि वाढत्या वयातील मुलांच्य विकासासाठी आणि त्यांना आनंदी राहण्यासाठी भरपूर आणि चांगली झोप अत्यंत आवश्यक आहे. एका संशोधनातून असं सांगण्यात आलं आहे की, मुलांच्या बौद्धिक विकासासाठी भरपूर आणि पुरेशी झोप घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे तुमचं मुल किती वेळासाठी झोपतं, या गोष्टीकडे लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांची झोप जर त्यांच्या वयानुसार योग्य नसेल तर, पालकांसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते. जाणून घेऊया कोणत्या वयामध्ये लहान मुलांसाठी किती झोप घेणं आवश्यक असतं त्याबाबत...
नवजात बालकापासून ते 6 महिन्यांपर्यंत
बाळाचा जन्म झाल्यापासून ते 6 महिन्यांपर्यंत मुलं जवळपास 16 ते 17 तासांसाठी झोपतात. ही झोप मुलं 3, 4 किंवा 5 तासांच्या झोपेने पूर्ण करतात. अनेक मुलं दिवसा झोपतात, तर काही फक्त रात्रीच. हा काळ मुलांच्या जीवनातील सर्वात शांततेचा काळ असतो. दरम्यान, झोपेची वेळ मुलांच्या सवयींवर अवलंबून असतो.
6 ते 12 महिन्यांची मुलं
6 ते 12 महिन्यांमध्ये मुलांच्या शरीराचा विकास होण्यासाठी सुरूवात होते. या वयामध्ये मुल गोष्टी ओळखणं आणि नवनवीन गोष्टी शिकण्यास सुरुवात करतं. अशातच त्याचं शरीर थकतं, त्यामुळे त्याला कमीत कमी 12 ते 15 तासांची झोप घेणं आवश्यक असतं. या मुलांची झोपण्याची वेळ ठरलेली नसते, पण या मुलांनी दुपारी कमीतकमी तीन तासांसाठी झोप घेणं अत्यंत आवश्यक असतं.
1 ते 3 वर्ष वयोगटातील मुलं
1 ते 3 वयोगटात मुलं फार अॅक्टिव्ह होण्यास सुरुवात होते. त्यामुळे या वयोगटातील मुलांनी 13 तासांची झोप पूर्ण करणं गरजेचं असतं. दरम्यान, एकत्रच दोन ते तीन तासांची झोप घेतली तर ते त्यांच्यासाठी अत्यंत फायदेशीर असतं.
3 ते 5 वर्षांपर्यंतच्या मुलांची झोप
3 ते 5 वयोगटातील मुलं सामाजिकरित्या अॅक्टिव्ह होऊ लागतात. बाहेर खेळायला जाणं, आजूबाजूच्यांशी संवाद साधणं यांसारख्या गोष्टी ही मुलं करत असतात. मुलांच्या बौद्धिक विकासामध्ये झोप अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावत असते. त्यामुळे या वयोगटातील मुलांना कमीत कमी 12 तासांची झोप घेणं आवश्यक असतं. अशातच योग्य वेळी झोप घेणं अत्यंत आवश्यक असतं. यामुळे आरोग्यासोबतच मुलांचं मानसिक स्वास्थही उत्तम राहण्यास मदत होते.
5 ते 10 वयोगटातील मुलं
जशी-जशी मुलं मोठी होतात त्यांची झोप कमी होत जाते. कारण त्यांच्या दिवसभरातील कामांमध्ये वाढ होऊ लागते. मुलं शाळेत जाऊ लागतात. अशातच त्यांच्या झोपेची पूर्ण काळजी घेणं आवश्यक असतं आणि कमीतकमी 10 ते 12 तासांची झोप आवश्यक असते.