(Image Credit : www.momjunction.com)
लहान मुलांना जर टीव्ही बघण्याची संधी आणि गेम खेळायला मोबाइल दिला गेला तर ते दिवसभरही यात वेळ घालवू शकतात. जर तुमच्या घरातील लहान मुलांनाही हीच सवय असेल तुम्हाला सावध होणे गरजेचे आहे. अमेरिकेतील सीएचईओ यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, जी लहान मुलं-मुली जास्त वेळ कम्प्युटर, टीव्ही, स्मार्टफोनवर दोन तासांपेक्षा अधिक वेळ घालवत असतील ते बुद्धु होऊ शकतात. 'द लॅंसेट चाइल्ड अॅन्ड एडोलेसेंट हेल्थ जर्नल'मध्ये या अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत.
ही बाब सिद्ध करण्यासाठी अभ्यासकांनी ८ ते ११ वयोगटातील ४ हजार ५०० लहान मुला-मुलींच्या दिनक्रमाचं निरीक्षण केलं. टीव्ही स्क्रीन असो वा मोबाइल ते घालवत असलेला वेळ आणि त्यासोबतच त्यांच्या झोपेची गुणवत्ता व शारीरिक सक्रियतेचा स्तरही अभ्यासकांनी तपासला. याचे परिणामही आश्चर्यकारक आहे. जी मुलं दररोज दोन तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही, कम्प्युटर किंवा स्मार्टफोनला चिकटून राहतात, त्यांची बौद्धिक आणि तार्किक क्षमता ५ टक्के कमी आढळली आहे. इतकेच नाही तर अशा मुलांना एकाग्रता आणि स्मरणशक्ती संबंधी समस्याही आढळल्या आहेत. तसेच या मुलांमध्ये वजन वाढण्याची समस्याही बघितली गेली आहे.
या अभ्यासाचे अभ्यासक डॉक्टर जेरेमी वॉल्श यांनी सांगितले की, टीव्ही, इंटरनेट, सोशल मीडिया आणि व्हिडीओ गेम्सची सवय लहान मुला-मुलींमध्ये केवळ शारीरिक असक्रियतेचं नाही तर अनिद्रेचंही कारण बनते. याने मुलांचं वजन वाढण्याची समस्या वाढत आहे. त्यांच्या मेंदुचा विकास योग्यप्रकारे होत नाहीये. कोणतीही सूचना लक्षात घेणे, तिचं योग्य विश्लेषण करुन त्यांच्या निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यात त्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
या अभ्यासातून हेही समोर आलं आहे की, जी लहान मुलं-मुली वाचण्या-लिहिण्याची सवय लवकर विकसित करतात, त्यांच्यातील कौशल्याचा विकास अधिक लवकर होतो. पुस्तके वाचताना त्यांचा मेंदु तितकाच सक्रिय होतो, जितका व्यायाम करताना होतो. याने मेंदुमध्ये नव्या पेशींचा विकास वाढतो. याने आठवणी साठवणे, तर्क शक्ती कायम ठेवणे आणि एकत्र एकापेक्षा जास्त कामे करणे या क्षमता वाढतात. अभ्यासकांनी लहान मुलांना बाहेर खेळणे, नियमीतपणे व्यायाम करणे आणि रात्री कमीत कमी ८ ते १० तासांची झोप घेणे याचा सल्ला दिला आहे.