कोणत्याही पालकांसाठी आपल्या लहान मुलांचा राग शांत करणं सोपं काम नाहीये. खासकरुन जेव्हा तुम्ही एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये असता तेव्हा मुलांना शांत करण्याचे पर्याय नसतात. अशावेळी अनेक पालक हे आपल्या मुलांवर चिडतात. पण अशाप्रकारे चिडून मुलं शांत होत नाहीत. उलट ते आणखी जास्त आरडाओरड करतात. पण तुम्ही कधी विचार केलाय का, मुलं असं का करतात? खरं तर चिडचिड करण्याची अनेक कारण असू शकतात.
तुमची मुलं सतत चिडचिड करतात का? किंवा ती सतत आक्रमक होत असतील तर यामागील सर्वात मोठं कारण साखर असू शकते. गोंधळलात का? जास्त प्रमाणात साखरेचं सेवन केल्यामुळे तुमचं मुल आक्रमक आणि रागीट होऊ शकतं. नुकत्याच झालेल्या एका संशोधनातून हे सिद्ध झालं आहे. संशोधनात सांगितल्यानुसार, ज्या मुलांच्या आहारात साखरेचं प्रमाण अधिक असतं किंवा जी मुलं सर्वात जास्त साखर खातात, ती अधिक हिंसक, अल्कोहॉलिक आणि सिगरेट पिण्यास जास्त प्रवृत्त होतात. हे संशोधन जर्नल सोशल सायन्स अॅन्ड मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. अनेक संशोधनांचे विश्लेषण केल्यानंतर असं समोर आलं की, जास्त साखर खाल्याने किंवा साखरेचं प्रमाण जास्त असलेलं पेय प्यायल्याने 11 ते 15 वर्षांच्या मुलांमध्ये हिंसकवृती वाढते. संशोधनानुसार, जर एखादं मुल जास्त मिठाई किंवा एनर्जी ड्रिंक घेत असेल तर त्याचं असं करणं दुसऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतं. तेच दुसऱ्या एका संशोधनातून सांगितले की, लहान मुलांमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांची भांडणामध्ये पडण्याची शक्यता वाढवतं. त्यामुळे 95 टक्के मुलं नशेच्या आहारी जातात.
संशोधकांचं असं म्हणणं आहे की, एनर्जी ड्रिंक, चॉकलेट आणि मिठाईचे अधिक सेवन केल्यामुळे मुलांच्या वागण्यावर वाईट परिणाम होतो. कारण यामध्ये कॅफेन अधिक असतं. इस्रायलमधील बार इलन युनिवर्सिटीने 137,284 मुलांवर अभ्यास केला. ज्यामध्ये 11, 13 किंवा 15 वर्षांच्या मुलांचा समावेश केला होता. यामध्ये असं आढळून आलं की, मुलांच्या वागण्याचा त्यांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणाशी घनिष्ट संबंध आहे.
नॅशनल हेल्थ सर्विस इंग्लडच्या गाइडलाइन्सनुसार, 11 वर्षांची मुलं 30 ग्रामपेक्षा जास्त साखर खात नाहीत. कोकाकोलाच्या एका कॅनमध्ये 35 ग्रॅम साखर असते. 4 ते 6 वर्षांच्या मुलांना दिवसभरासाठी 19 ग्राम साखर देणं शक्यतो टाळावं.
संशोधकांनी सांगितले की, मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे त्यांना मोठे झाल्यावर कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो याचा अंदाज येतो. अभ्यासानुसार, अधिकाधिक प्रकरणांमध्ये मुलांच्या आहारातील साखरेचे प्रमाण आणि त्यांचं वागणं यामध्ये त्यांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या वागण्याचा फरक पडत नाही.