धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोकांना पोटाच्या समस्यांसोबतच बद्धकोष्टाच्या समस्येचाही सामना करावा लागत आहे. अनेक लोक बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेऊन तात्पुरता इलाज करतात. अनेकदा ही समस्या एवढी वाढते की, डॉक्टरांचा सल्ला घेणं भाग पडतं. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या स्वयंपाक घरातच काही असे पदार्थ आहेत, जे पोटाच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. जाणून घेऊया अशा पदार्थांबाबत...
त्रिफळा
यामध्ये तीन फळं असतात ती म्हणजे, आवळा, हिरडा आणि बेहडा. हा एक अत्यंत उपयोगी उपाय आहे. याच्या सेवनाने पोटाच्या सर्व समस्या दूर होण्यासोबतच पचनक्रिया सुरळीत करण्यासही मदत करते. तुम्ही गरम पाण्यासोबत एक चमचा त्रिफळाचे सेवन करू शकता. किंवा रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यानंतर त्रिफळा पावडरचं मधासोबत एकत्र करून खाऊ शकता.
मनुके
मनुक्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी मनुके अत्यंत फायदेशीर ठरतात. रात्री झोपताना एक मुठभर मनुके पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी अनोशापोटी यांचं सेवन करा. सर्व समस्या दूर होतील.
अंजीर
सुकलेले किंवा पिकलेले कोणतेही अंजीर आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. बद्धकोष्टापासून सुटका करण्यासाठी एक ग्लास दूधामध्ये अंजीर एकत्र करून उकळून घ्या. हे मिश्रण रात्री झोपण्यापूर्वी प्या. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की, कोमट असतानाच त्याचं सेवन करा. याव्यतिरिक्त तुम्ही अंजीर फळ म्हणूनही खाऊ शकता.
भरपूर पाणी प्या
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बद्धकोष्टापासून सुटका मिळवण्यासाठी तेलकट किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करणं शक्यतो टाळावं. जर बद्धकोष्टाची समस्येने हैराण असाल तर भरपूर पाणी प्या.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)