नितांत महाजन
साठीच्या आजोबांचे गुडघे दुखले तर विशेष नाही पण आजोबांच्या आधी ऐन पंचविशीत नातवाचे पाय दुखतात, पोटर्यांत गोळे येतात, गुडघे दुखतात, जिने चढउतार नको वाटते अशावेळी काळजी वाटणारच. पण नुस्ती काळजी करुन हा प्रश्न सुटणार नाही, कारण गुडघेदुखी म्हणजे आपलं शरीर आपल्याला काही सांगत असतं, ते वेळीच ऐकलं नाही तर पुढे वाढत्या वयात पश्चाताप अटळ आहे. त्यामुळे गुडघेदुखीकडे दुर्लक्ष करु नका.मुळात हल्ली सगळ्यांचंच चालणं कमी आहे. व्यायामाचा अभाव. सूर्यप्रकाशात काम कमीच. त्यामुळे डीथ्री आणि कॅल्शिअमची कमतरता अनेक तरुण मुलांमध्ये जाणवते. मुलींमध्ये तर जास्तच. त्यात अॅनिमिक. हिमोग्लोबिन कमी. त्यातून गुडघेदुखी बळावताना दिसते.मात्र अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. किंवा वरवर तेल चोपडून टाकतात. त्यानं तात्पुरता आराम पडतोही. पण तरी मूळ कारण न सापडल्यानं आपला गुडघा किंवा सांधे का दुखत आहेत, पायात रात्री झोपताना गोळे का येतात हे कळत नाही. त्यातून गुडघेदुखी बळावते. आणि आपल्या चालण्याच्या, पायर्या चढण्याच्या क्षमतेवर आणि आत्मविश्वासावरही वाईट परिणाम होतो. त्यामुळे गुडघे दुखत असतील तर वेळीच डॉक्टरांना दाखवा. योग्य आहारविहार, व्यायाम यांच्यामदतीने गुडघेदुखीवर मात करा.