वाढत्या टेक्नॉलॉजीच्या या विश्वात लॅपटॉप किंवा कम्प्युटरशिवाय काम करण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. आपल्या दैनंदिन कामांसोबतच व्यक्तीचं भविष्य आणि नोकरीही कम्प्युटरवर आधारित आहे. अशात कम्प्युटरचा वापर अधिक होणे स्वाभाविक आहे. पण कम्प्युटरच्या अधिक वापराने व्यक्तीला वेगवेगळे आजाराही तितक्या वेगाने आपल्या जाळ्यात घेत आहेत. झालं असं आहे की, लोकांना याची सवयही लागली आहे. कामा व्यतिरिक्तही अनेक लोक कम्प्युटर आणि लॅपटॉपवर मनोरंजनासाठी अधिक वेळ देत आहेत. अशात त्यांना त्यांची ही सवय मोडणेही कठीण झाले आहे.
डोकेदुखी
कम्प्युटर आणि लॅपटॉपसारखे इलेक्ट्रॉनिक उपकरण डोकेदुखीचं आणि मायग्रेनचं मोठं कारण ठरतात. त्यामुळे जर तुम्ही खूप जास्त वेळ कम्प्युटरवर काम करत असाल तर तुम्हाला डोकेदुखी आणि मायग्रेनची समस्या होऊ शकते. असे मानले जाते की, कम्प्युटरच्या स्क्रीनचा प्रकाश, पॅटर्न आणि चित्रांमुळे व्यक्तीच्या आरोग्यावर सर्वात जास्त वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना डोकेदुखीची समस्या होते.
मांसपेशींमध्ये समस्या
एका रिसर्चमध्ये असं आढळलं आहे की, फार जास्त वेळ खुर्चीवर बसून कम्प्युटर काम करत राहिल्याने मांसपेशी थकतात. त्यामुळे मांसपेशींमध्ये वेदना होण्याची समस्या उत्पन्न होते. त्यासोबतच पाय, छाती, खांदे आणि हात सुन्न होतात. कम्प्युटरवर अनेक तास सतत बसून राहिल्याने हे एक मोठं नुकसान होतं.
डोळ्यांसाठी घातक
कम्प्युटरवर काम करतेवेळी सतत स्क्रीनकडे बघत राहणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी घातक आहे. अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासात असं आढळलं की, फार जास्त वेळ स्क्रीनसमोर बसल्याने डोळ्यांना थकवा, खाज, डोळ्यातून पाणी येणे आणि डोळ्यांना जड वाटणे या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे डोळ्यांची दृष्टी अकाली कमजोर होते. खासकरुन लहान मुलांच्या डोळ्यांवर याचा फार वाईट प्रभाव पडतो.
तणाव वाढतो
फार जास्त वेळ लॅपटॉप किंवा कम्प्युटर स्क्रीनवर काम करणे तणाव वाढण्याचं मोठं कारण आहे. तासंतास कम्प्युटरवर काम केल्याने व्यक्तीच्या एकाग्रतेत कमतरता येते. त्यांना सतत २४ तास हलकी डोकेदुखी होत राहते. नंतर अशी स्थिती येते की, व्यक्ती गंभीर स्ट्रेस, डिप्रेशन आणि वेगवेगळ्या मानसिक समस्यांनी ग्रस्त होतो.
वजन वाढतं
लॅपटॉप, कम्प्युटर, टॅबलेट आणि स्मार्टफोनचा वापर जास्त वेळ करणे आजकाल लोकांच्या जीवनशैलीचा भाग झालं आहे. मात्र कम्प्युटरचा अधिक वापर करणारे जवळपास ३० टक्के लोक वेगाने वजन वाढण्याच्या समस्येचे शिकार होत आहेत. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की, कम्प्युटरचा अधिक वापर सर्वच वयोगटातील लोकांच्या, खासकरुन लहान मुला-मुलींच्या सुस्त आणि आळशी होण्याचं कारण आहे. त्यानंतर त्यांचं वजन वाढण्याची शक्यता अधिक वाढते. तसेच डायबिटीज आणि हृदयरोगांचाही धोका वाढतो.