डॉ. अमोल अन्नदाते
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सध्या राज्यात सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी सुरू आहे. तसंच अशी फवारणी सुरू असलेले चेंम्बर्स तयार करून त्यात माणसांनी जायचे, असे प्रकार सुरू आहेत. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर फवारणी करून कोरोना व्हायरसला रोखणे अवघड आहे. शिवाय याचे दुष्परिणाम सुद्धा आहेत. हा व्हायरस हवेतून दूरवर पसरत नाही. तो आठ मीटर हवेत उडून नंतर खाली बसतो. म्हणून हवेत फवारणीचा काही उपयोग नाही.
सार्वजनीक आरोग्याचे उपाय कराताना परिणामकारकता-खर्च-दुष्परिणाम हे त्रैराशीक मांडावे लागातात. कॅरिअर व्यक्तीने नेमके कुठे हात लावले आहेत. हे माहीत नसताना अख्खे गाव, विभाग फवारणी करणे तर उपयोगाचे नाहीच. पण याने आर्थीक निधीचा अपव्यय सुद्धा होतो. सार्वजनिकरित्या फवारणी केल्याने डोळे, त्वचा, नाक चुरचुरणे, घसा खवखवणे, दुखणे/ खोकला असे दुष्परिणाम होऊ शकतात.
फवारणी करायची असेल तर फक्त ज्या बिल्डिंगमध्ये रुग्ण सापडला आहे. किंवा असा छोडा भाग जेथे खूप रुग्ण सापडले आहेत. अशा ठिकाणी करावी. वैयक्तीक पातळीवर घर स्वच्छ करण्यासाठी ग्लोव्हज , गॉगल, मास्क घालून घरात सोडीयम हायपोक्लोराईडने स्वच्छता करण्यास तसंच ज्या रुग्णालयात रुग्ण असेल तिथेही फवारणी करण्यात हरकत नाही. निर्जंतुकीकरण कक्षाबद्दल सुद्धा असेच आहे. संसर्गाचा सगळ्यात मोठा धोका हा कोरोनाबाधित व्यक्तीशी संपर्कात येऊन त्याच्या खोकण्या, शिंकण्यातून आहे. तसंच त्याने हात लावलेल्या ठिकाणाला स्पर्श करण्यातून आहे.
फक्त निर्जंतुकीकरण कक्षातून जाऊन हा धोका कसा टळेल? काहींनी या कक्षातून चक्क हॅण्ड सॅनिटायजर संपूर्ण अंगावर फवारणीची सोय केली आहे. या कक्षातून जात असलेल्या व्यक्तीवर दुष्परिणाम होत आहे. जागतीक आरोग्य संघटना व सीडीसीने ही अशा कक्षांना मान्यता दिलेली नाही. तामिळनाडूच्या आरोग्य विभागाने शासनाचे परिपत्रक काढून असे कक्ष बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
-लेखक बालरोगतज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.