सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये झटपट भूक भागवण्यासाठी आपण अनेकदा जंक फूडचा आधार घेतो. जंक फूड अनेकजणांच्या तर रूटिनचाच भाग झाले आहेत. जंक फूडमधील सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे, बर्गर. लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच बर्गर खायला फार आवडतं. एवढचं नाहीतर काम करताना भूक लागली असेल तर, भूक भागवण्यासाठी सर्वात पहिला पर्याय म्हणजे बर्गरचं असतो. पण आपल्यापैकी अनेक लोकांना बर्गरमुळे होणाऱ्या शरीराच्या समस्यांबाबत अजिबातच माहिती नसते.
झटपट भूक भागवणारा बर्गर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतो. मग तुम्ही दिवसभरात कधीही खा, बर्गरमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतातच. खरं तर बर्गरमध्ये अनेक अशी तत्व असतात जी शरीराला फायदेशीर ठरण्याऐवजी घातक ठरतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी करण्याचं काम ही तत्व करत असतात. फास्ट फूडमध्ये साधारणतः ट्रान्स फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असतात. जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करण्यासाठी कारणीभूत ठरतात.
हाय ब्लड प्रेशर आणि हृदयरोगाचा धोका
आहारात फळांचा समावेश केल्याने अशा आजारांपासून बचाव करणं शक्य असतं. बर्गरमध्ये असे फॅट्स असतात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. अशा फॅटी पदार्थांचं जास्त आणि सतत सेवन केल्याने शरीरातील धमण्यांवर परिणाम होतो. यामुळे शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. परिणामी भविष्यामध्ये हृदयाशी निगडीत समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बर्गरसारख्या फास्ट फूड पदार्थांमुळे अस्थमा, एग्जिमा, त्वचेच्या समस्या आणि डोळ्यांमध्ये पाणी येणं यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. आहारामध्ये असलेली पोषक तत्वांची कमतरता अॅलर्जीसारखे आजार वाढण्याचं कारण ठरते.
आजारांचा भंडार आहे बर्गर
बर्गरमध्ये कॅलरी, फॅट्स आणि अतिरिक्त सोडिअमचे प्रमाण अधिक असतं. ही सर्व तत्व आरोग्यासाठी हानिकारक ठरतात. एका बर्गरमध्ये 500 कॅलरी, 25 ग्रॅम फॅट्स, 40 ग्रॅम कार्ब्स, 10 ग्रॅम साखर आणि 1,000 मिलीग्राम सोडिअम असतं. ही सर्व तत्व आपल्याला आजारी पाडण्यासाठी पुरेशी असतात.
डायबिटीस
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बर्गरचा पहिला घास खाल्यानंतर 15 मिनिटांनी आपल्या शरीरातील ग्लूकोजची पातळी वाढते. तसेच बर्गरमधील तत्व शरीरातील इन्सुलिन रिलीज करण्यासाठी बढावा देतात. ज्यामुळे तुम्हाला काही वेळातच पुन्हा भूक लागते. त्यामुळे सतत बर्गरचे सेवन केल्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. एवढचं नाहीतर एकाच वेळी सर्वाधिक कॅलरी घेतल्याने शरीरातील पेशींवर ऑक्सिडेटिव्ह ताण येतो.
व्हिटॅमिन डी मध्ये कमतरता
तुम्ही जर बर्गरचं अधिक सेवन केलं तर, व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शिअमची कमतरता शरीरातील हाडं कमकुवत करते. एवढचं नाही तर अनेकदा हाडं ठिसूळ होतात. बर्गरमध्ये असलेले फॅट्स, मीठ किंवा साखर यांमुळे पोट भरतं खरं, पण शरीराला आवश्यक असणारे प्रोटिन्स, व्हिटॅमिन्स, कॅल्शिअम किंवा मिनरल्स अजिबात मिळू शकत नाहीत.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.