बदामामध्ये जास्त पोषक घटक असतात. बदामामुळे बुद्धी तल्लख होते आणि दृष्टी देखील चांगली राहते. पालक आपल्या मुलांना दररोज हमखास बदाम खायला देतात. बदाम खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. पण कोणतीही गोष्टी जर जास्त प्रमाणात खाल्ली तर त्यामुळे नुकसान होतं असं म्हणतात. एका दिवसात नेमके किती बदाम खावेत ते जाणून घेऊया...
रिसर्चमध्ये असं म्हटलं आहे की एखाद्या व्यक्तीने दिवसभरात ३० ग्रॅम बदाम खावेत. तुमच्या शरीराला एका दिवसात आवश्यक असलेल्या पोषक तत्वांसाठी बदामांची ही मात्रा पुरेशी आहे. यामध्ये आवश्यक तेवढे मिनरल्स, व्हिटॅमिन्स, प्रोटीन आणि हेल्दी फॅट आहे. मात्र यापेक्षा जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते, कॅलरीज वाढू शकतात.
भारतात साधारणपणे दिवसातून दोन ते पाच भिजवलेले बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. आयुर्वेदात बदाम शरीराचं तापमान वाढू शकतो असं म्हटलं जातं. तो वात आणि कफ या दोघांना संतुलित करतो. उष्णता निर्माण करणारे गुणधर्म असल्यामुळे पित्त वाढू लागतं. बदाम जास्त प्रमाणात खाल्ल्यास किंवा खाण्यापूर्वी ते भिजवलेले नसल्यास शरीर गरम होतं, ज्यामुळे एसिडीटी होऊ शकते.
बदाम रात्रभर पाण्यात भिजवून खाण्याचा सल्ला आयुर्वेदात दिला आहे. त्यामुळे ते पचायला सोपं जातं. त्याचे उष्णता निर्माण करणारे गुणधर्म थोडे कमी होतात. म्हणूनच हिवाळ्याच्या काळात बदाम तसेच खाल्ले जातात आणि उन्हाळ्यात खाण्याआधी ते व्यवस्थित भिजवण्याचा सल्ला दिला जातो. बदाम खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात.