कलिंगड हे उन्हाळ्यात वरदान मानलं जातं. कारण यात भरपूर प्रमाणात पाणी असल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या समस्या याने दूर होतात. याने ना केवळ आरोग्याला फायदा तर सौंदर्यासाठीही कलिंगड फायदेशीर ठरतं. पण अनेकजण कलिंगडातील बीया फेकून देतात. पण कलिंगडाच्या बीया सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कलिंगडाच्या बियांनी तुम्हाला लैंगिक समस्या, मधुमेह, हृदयरोग, त्वचा आणि केसांसंबधी समस्या दूर करण्यास मदत मिळते. चला जाणून घेऊ याचे फायदे...
(Image Credit : realfoodforlife.com)
कलिंगडाच्या बियांचे पोषक तत्त्व - इतर खाद्य पदार्थांच्या तुलनेत कलिंगडाच्या बियांमध्ये अधिक प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. तसेच या बियांमध्ये कॅलरी कमी असतात, पण प्रोटीन आणि व्हिटॅमिन्स अधिक प्रमाणात असतात. त्यासोबतच यात फॅटी अॅसिडही भरपूर प्रमाणात असतात.
फेकू नका कलिंगडाच्या बीया - अनेकजण कलिंगड तर आवडीने खातात पण कलिंगडाच्या बीया फेकून देतात. या बीयांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात. पण काही लोकांना असं वाटतं की या बीया पचायला जड जातील. या बीया आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतात. कारण या बीयांमध्ये सूक्ष्म पोषक तत्त्वे जसे की, पोटॅशिअम, तांबे, सेलेनियम आणि झिंक इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. या बीयांमध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी सुद्धा भरपूर प्रमाणात असतात.
असं करा सेवन - औषधी गुण असलेल्या या बीया खाव्यात कशा असा प्रश्न अनेकांना पडतो. सामान्यपणे कलिंगडाच्या बियांचं सेवन तुम्ही सुविधा आणि इच्छेनुसार करु शकता. त्यासोबतच या बीया तुम्ही कलिंगडासह तशाच कच्च्या खाऊ शकता. तसेच या बीयांना अकुंरित करुन किंवा भाजूनही खाऊ शकता. हे कशाप्रकारेही तुमच्यासाठी फायदेशीर असतात. पण या बीया खाताना बारीक चाऊन चाऊन बारीक करुन खाव्यात नाही तर पचनाला जड जाऊ शकतात.
बीया आरोग्यासाठी कशा फायदेशीर - कलिंगडाच्या बीया का खाव्यात असा एक सामान्य प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर वर आधी दिलं आहेच. या बीया तुम्ही अंकुरित करुन खाल्ल्यात तर याचे फायदे अधिक होतात. 1/8 कप कलिंगडाच्या बियांचं सेवन केल्याने तुम्हाला १० ग्रॅम प्रोटीन मिळतं. तसेच कलिंगडाच्या बियांमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडचं प्रमाणही भरपूर असतं. त्यासोबतच मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन बी सुद्धा असतात. हे सर्वच घटक शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यासाठी मदत करतात.