आपल्या झोपेचा थेट आरोग्याशी संबंध असतो. असे म्हणतात की, चांगली झोप आपल्याला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी बनवते. परंतु, आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि तणावामुळे, फार कमी लोक शांतपणे झोप घेऊ शकतात. कमी झोप मिळाली असता चिडचिडेपण वाढतो. परंतु, इतर कोणत्याही कारणास्तव जर आपल्याला पुरेशी झोप मिळत नसेल तर, आपल्या शारीरिक समस्यांमध्ये वाढ होऊ शकते. शरीराला पुरेशी झोप न मिळाल्यामुळे बरेच लोक स्लीपिंग डिसऑर्डरला बळी पडतात. सुरुवातीला याचा अंदाज येत नाही. परंतु, नंतर त्याचे फार गंभीर परिणाम होऊ शकतात.
झोपेच्या कमतरतेमुळे, निद्रानाश आणि नार्कोलेप्सी सारख्या समस्या उद्भवतात. याबद्दल बऱ्याच जणांना माहिती असते. परंतु, ‘स्लीप एपनिया’बद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. ‘स्लीप एपनिया’ म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत.
स्लीप एपनिया म्हणजे काय?स्लीप एपनिया एक प्रकारचा झोपेचा विकार आहे. ज्यामध्ये झोपेच्या दरम्यान श्वास घेण्यास त्रास होतो. स्लीप एपनियामुळे आपण काही सेकंद श्वास घेऊ शकत नाही. वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात की, रात्री झोपेच्या दरम्यान श्वसनक्रियेत अनेकदा अडथळा उद्भवू शकतो. त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि झोप मोड होते. ज्यामुळे निद्रानाशाची शक्यता असते. सकाळी डोके दुखणे, थकवा, मूड स्विंग आणि नैराश्य ही स्लीप एपनियाची लक्षणे आहेत.
स्लीप एपनियाचा आपल्या मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो?डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, स्लीप एपनिया आपल्या झोपेवर परिणाम करतो, ज्यामुळे रात्री सतत जाग येते. 8 तासांची झोप घेतल्यानंतरही बर्याच वेळा आपल्याला थकल्यासारखे वाटते. जॉर्जिया येथील ऑगस्टा युनिव्हर्सिटीच्या मेडिकल कॉलेजमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार मानसिक ताणतणाव झोपेत व्यत्यय आणण्याचे मुख्य कारण ठरते. संशोधनात असेही समोर आले आहे की, बहुतेक रुग्ण कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील आहेत, जे एकटे राहतात आणि ज्यांना सामाजिकपातळीवरही कमी लेखले गेलेले असते. झोपेच्या अभावामुळे ऑब्सट्रक्टिव स्लीप एपनियाग्रस्त लोकांमध्ये चिडचिडेपणा, मूड स्विंगसारख्या समस्या उद्भवतात.
स्लीप एपनियावर उपचार काय?आपल्याला जर स्लीप एपनियाची लक्षणे जाणवत असतील, तर आपल्या डॉक्टरांशी बोला. डॉक्टर तुमची स्लीपिंग पॅटर्न तापासतील. त्याचबरोबर झोपेच्या दरम्यान ऑक्सिजन तपासणी म्हणजेच सीपीएसी थेरपी दिली जाईल.