कॅन्सर अर्थात कर्करोग हा जीवघेणा आजार मानला जातो. कॅन्सरचे अनेक प्रकार आहेत. कॅन्सर होण्यास बदलती जीवनशैली, व्यसनं, व्यायामाचा अभाव, अनुवंशिकता आदी गोष्टी कारणीभूत ठरू शकतात, असं तज्ज्ञ सांगतात. कॅन्सरची काही लक्षणं सुरुवातीच्या टप्प्यात शरीरात दिसू लागतात. अशावेळी तातडीनं निदान, उपचार गरजेचे असतात. कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरवर सुरुवातीच्या टप्प्यात उपचार झाले तर रुग्णास निश्चित दिलासा मिळू शकतो.
गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे पोटाचा अर्थात गॅस्ट्रिक कॅन्सर होण्याचं प्रमाण वाढलं आहे. या कॅन्सरच्या पेशी साधारणपणे पोटाच्या आतील भागात वाढू लागतात. कॅन्सर विकसित झाल्यावर तो पोटाच्या आतील बाजूस खोलवर पसरतो. जगभरात हा कॅन्सर सर्वसामान्य मानला जातो. पण या कॅन्सरची काही लक्षणं सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. हा कॅन्सर होण्यामागे अनेक कारणं आहेत. `एनडी टीव्ही इंडिया`ने या विषयीची माहिती दिली आहे.
गॅस्ट्रिक कॅन्सर तुमच्या पोटात कुठेही होऊ शकतो. ज्या ठिकाणी पोटाचा भाग अन्ननलिकेला जोडलेला असतो, त्या ठिकाणी पेशींची असामान्य वाढ होते. हा प्रकार यूएसमधील (US) गॅस्ट्रिक कॅन्सर झालेल्या अनेक रुग्णांमध्ये दिसून आला आहे. इतर देशांमध्ये गॅस्ट्रिक कॅन्सर सर्वसामान्य असून, त्याच्या गाठी पोटाच्या मुख्य भागात तयार झाल्याचं दिसतं. सुमारे 95 टक्के रुग्णांमध्ये हा कॅन्सर पोटाच्या अस्तरात सुरू होतो आणि हळूहळू पसरतो. वेळेवर उपचार न केल्यास त्याचे रूपांतर ट्यूमरमध्ये होऊ शकतं आणि तो पोटाच्या खोलवर भागात वाढू शकतो. हा ट्यूमर तुमच्या यकृत आणि स्वादुपिंडासारख्या जवळच्या अवयवांमध्येही पसरू शकतो.
गॅस्ट्रिक कॅन्सर हा सर्वसामान्य कॅन्सरपैकी एक असून, यूएसमध्ये दरवर्षी सुमारे 1.5 टक्के रुग्णांमध्ये या कॅन्सरचं निदान होतं. मात्र गेल्या 10 वर्षांत या रुग्णसंख्येत घट होत आहे. तुमच्या पोटाच्या पेशींच्या डीएनएमध्ये अनुवंशिक बदल झाल्यास हा कॅन्सर होतो. डीएनए हा एक कोड असतो, जो पेशींना कधी वाढायचं आणि कधी मृत व्हायचं हे सांगतो. उत्परिवर्तनामुळे पेशी वेगानं वाढतात आणि अखेरीस मृत होण्याऐवजी त्यापासून ट्यूमर तयार होतो. निरोगी पेशींच्या तुलनेत कॅन्सर पेशी वेगानं वाढतात आणि शरीराच्या इतर भागांमध्ये पसरू लागतात.
कोणालाही पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. तसंच काही घटकांमुळे हा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. जर तुमचं वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल आणि तुमची वांशिक पार्श्वभूमी पू्र्व आशियायी, दक्षिण किंवा मध्य अमेरिकी आणि पूर्व युरोपीय असेल तर तुम्हाला हा कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते.
काही घटकांमुळे पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. यात पोटाच्या कॅन्सरची कौटुंबिक पार्श्वभूमी, एपस्टीन-बार विषाणूचा संसर्ग, पोटाचा अल्सर होण्याची पार्श्वभूमी, आहारात फळं, भाजीपाल्याचा समावेश नसणं, धूम्रपान किंवा तंबाखू चघळण्याचं व्यसन, अतिमद्यपान, चरबीयुक्त, खारट किंवा मसालेदार पदार्थ जास्त खाणं, लठ्ठपणा, ऑटोइम्युन एट्रोफिक गॅस्ट्रायटिस, जठराला सूज येणं, गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लक्स विकार, हेलिकोबॅक्टर पायलोरीचा संसर्ग यांचा समावेश आहे.
गॅस्ट्रिक कॅन्सरची काही लक्षणं सुरवातीच्या टप्प्यात दिसून येतात. त्यात कमी जेवण करूनही पोट भरल्यासारखं वाटणं, नाभीच्या वरील भागातील पोटात वारंवार दुखणं, जेवणानंतर गॅसेस झाल्यासारखं वाटणं, हार्टबर्न किंवा अपचन, वजन कमी होणं, शौचास काळ्या रंगाची होणं, रक्ताची उलटी होणं, भूक कमी होणं, अन्न गिळताना त्रास होणं, थकवा किंवा अशक्तपणा, मळमळ, उलटी या लक्षणांचा समावेश आहे. यापैकी वजन कमी होणं आणि पोटदुखीसारखी लक्षणं सुरुवातीच्या टप्प्यात दिसत नाहीत. परंतु, यापैकी कोणतंही लक्षण दिसत असल्यास तातडीनं वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे.