ओठ हा चेहऱ्याचं सौंदर्य वाढवणारा महत्त्वाचा घटक आहे. सुंदर ओठ हे सौदर्याला 'चार चाँद' लावतात. ओठ सुंदर असावेत असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे ओठ सुंदर आणि गुलाबी बनविण्यासाठी विविध उपाय केले जातात. तुम्हाला माहिती आहे का, ओठांचा रंग हा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार असल्याचं आपल्या सर्वांनाच माहीत आहे. त्यातच ओठाचा कर्करोगदेखील (Cancer) असतो.
ओठांचा कर्करोग झाल्यास अनेकांना वेळीच कळत नाही. त्यामुळे तो वाढतच जातो. ओठांवर सूज येणं हे ओठांच्या कर्करोगाचं पहिलं लक्षण आहे. ओठांवर कोणत्याही प्रकारची सूज (Lips Swelling) येत असेल तर काळजी घ्या. कारण ते ओठांच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ओठांचा कर्करोग होणाऱ्या सर्वाधिक व्यक्ती म्हणजे तंबाखू किंवा गुटख्याचे सेवन करणाऱ्या व्यक्ती. जगभरात ओठाच्या कर्करोगामुळे (Lips Cancer) लाखो मृत्यू होतात. ओठांचा कर्करोग का होतो आणि त्याची लक्षणं काय आहेत, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
सर्वांत महत्त्वाचं म्हणजे गुटखा किंवा तंबाखूचं सेवन करू नये. कारण हे ओठांचा कर्करोग होण्याचं मुख्य कारण आहे. यामुळे ओठांवर सूज येते. याशिवाय तोंडाची स्वच्छता ठेवणंदेखील गरजेचं आहे. काही वेळा तोंडाची स्वच्छता नसते. त्यामुळेही अशा प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तोंडाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष दिलं पाहिजे. तसंच तोंडाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. धूम्रपानही टाळावं.
अनेकांना ओठांवर लाल खुणा दिसतात. तसंच कधी ओठ सुजलेले दिसतात; पण, त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तुमच्याबाबतीत असं झालं असेल, तर दुर्लक्ष करू नका. हे ओठाच्या कर्करोगाचं लक्षण असू शकतं. ओठ सुजले असतील किंवा त्यावर लाल खुणा दिसत असतील तर ते कर्करोगाचं लक्षण असू शकतं. हा एक प्रकारचा तोंडाचा कर्करोग आहे. म्हणून ओठांची काळजी घ्या.
ओठांच्या कर्करोगाची लक्षणं दिसून आल्यावर वेळीच उपाय केल्यास यापासून बचाव होऊ शकतो. ही लक्षणं दिसत असतील तर वेळीच सावध व्हा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. कर्करोगाचं निदान सुरुवातीच्या टप्प्यात झाल्यास तो रुग्ण बचावण्याची किंवा बरा होण्याची शक्यता वाढते. यामुळे या रुग्णावर उपचार करण्यास डॉक्टरांना पुरेसा वेळ मिळतो व रुग्णही आणखी काही वर्षं चांगलं जीवन जगू शकतो.