(Image Credit : Amar Ujala)
जगभरात सर्वसामान्यपणे हेच मानलं जातं की, पुरुष महिलांच्या तुलनेत अधिक मद्यसेवन करतात. सत्यही हेच आहे की, ढोबळ मानाने महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक मद्यसेवन करतात. पण आता तो जुना काळ गेलाय कारण १९९१ ते २००० दरम्यान जन्म झालेल्या महिला तितकंच मद्यसेवन करतात, जितकं त्यांचे पुरुष साथीदार करतात. इतकेच नाही तर पिण्याच्या बाबतीत ही पिढी पुरुषांना मागे टाकत आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मद्यसेवनाच्या सवयीचा वाईट प्रभाव महिलांवर दिसत आहे. अमेरिकेतील एका आकडेवारीनुसार, २००० ते २०१५ दरम्यान ४५ ते ६४ वयाच्या महिलांचा सिरोसिसने मृत्यू होण्याचं प्रमाण ५७ टक्क्यांनी वाढलं आहे. तर याच वर्गात २१ टक्के पुरुष सिरोसिसच्या कचाट्यात येऊन मृत्यूमुखी पडले. तसेच २५ ते ४४ वयाच्या महिलांचा सिरोसिसने मृत्यू झाल्याच्या घटना १८ टक्के वाढल्या आहेत. तर याच वयोगटातील पुरुष साथिदारांचा सिरोसिसने मृत्यू झाल्याच्या घटना १० टक्के कमी आढळल्या. इतकेच नाही तर मद्याच्या ओव्हरडोजमुळे रुग्णालयात इमरजन्सीमध्ये दाखल होणाऱ्या महिलांची संख्याही वाढली आहे.
पण ही समस्या इतकीच आहे असे नाही. समस्या ही आहे की, महिलांवर मद्याचा प्रभाव पुरुषांच्या तुलनेत वेगळा होत आहे. तज्ज्ञांनुसार, महिलांच्या शरीरातून अल्कोहोल डिहायड्रोगेनेज एंजाइम फार कमी प्रमाणात निघतं, हे लिव्हरमधून निघत असतं आणि शरीरातील अल्कोहोल नष्ट करण्याचं काम करतं.
काय आहे कारण?
शरीरातील फॅट अल्कोहोल राखून ठेवतात. शरीरातील पाणी त्याच्या प्रभावाला कमी करतं. अशात नैसर्गिकरित्या शरीरात जास्त फॅट आणि कमी पाणी यामुळे महिलांवर अल्कोहोलचा वेगळा प्रभाव बघायला मिळतो. हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमधील मानसोपचार तज्ज्ञ डॉन सुगरमॅन यांनी सांगितलं की, 'महिलांवर मद्याचा प्रभाव वेगळा होत असल्यानेच मद्य पिणाऱ्या महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत जास्त समस्या बघायला मिळतात'.
ज्या महिला जास्त मद्यसेवन करतात त्यांच्यात पुरुषांच्या तुलनेत मद्याची सवय आणि आरोग्यासंबंधी समस्या जास्त निर्माण होतात. याला टेलीस्कोपिंग असं म्हणतात. म्हणजे महिला पुरुषांच्या तुलनेत उशीरा मद्यसेवन करण्यास सुरुवात करतात. पण लवकरच त्या मद्यसेवनाच्या आहारी जातात. इतकेच नाही तर महिलांमध्ये लिव्हर आणि हृदयासंबंधी रोगांच्या कचाट्यात येण्याची शक्यता अधिक असते.
मद्यसेवनाचा महिलांवर पुरुषांच्या तुलनेत असा काही प्रभाव होतो याबाबत १० वर्षांआधीपर्यंत फार माहिती उपलब्ध नव्हती. कारण यासंबंधी अभ्यास हे केवळ मद्यसेवन करणाऱ्या पुरुषांवर अधिक होत होते. १९९० नंतर परिस्थिती बदलली तेव्हा अमेरिकेतील नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ हेल्थने रिसर्चमध्ये महिलांना सामिल करणे सुरु केले.