महिलांचं कमी झोप घेणं याचा संबंध ऑस्टिओपोरोसिसच्या धोक्याशी आहे. म्हणजे महिलांमध्ये हाडांचं घनत्व कमी होऊ लागतं. याने हाडे कमजोर होतात आणि तुटण्याची भिती अधिक असते. जॉइंट्समध्ये नेहमी वेदना होत राहतात. त्यासोबतच रक्तात एस्ट्रोजनची कमतरता होऊ लागते. ऑस्टिओपोरोसिस आजाराचा धोका महिलांमध्ये पुरूषांच्या तुलनेत अधिक असतो.
अमेरिकेतील बफेलो विवि आणि या रिसर्चचे मुख्य लेखक हीथर ओक्स-बालकोम म्हणाले की, झोपेची कमतरता हाडांच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव करत आहे. या रिसर्चमध्ये ११ हजार ०८४ पोस्टमेनोपॉजल महिलांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. यात ज्या महिलांनी प्रत्येक रात्री ५ तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतल्याची सूचना दिली, त्यांची तुलना त्या महिलांशी करण्यात आली ज्या प्रत्येक रात्री ७ ते ८ तास झोप घेत होत्या.
काय झाले परिणाम
यानंतर याचं विश्लेषण करण्यात आलं. ज्यात कमी झोप घेणाऱ्या महिलांमध्ये हाडांचं घनत्व कमी आढळलं. यात संपूर्ण शरीर, कंबर, मान आणि पाठीचा कणा यांचा समावेश होता. रोज ५ तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेणाऱ्या महिलांमध्ये बोन मास, कंबरेतील हाडांमध्ये आणि पाठीच्या कण्यात कमजोरी होती. तसेच त्यांना ऑस्टिओपोरोसिसचा धोका २२ ते ६३ टक्के असतो. याप्रकारचे परिणाम पाठीच्या मणक्यावर बघायला गेले होते. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी कमीत कमी ७ तास झोप गरजेची आहे.
मानसिक आजाराचा धोका
रात्री उशीरापर्यंत जागणे आणि कमी झोप घेतल्याने लोकांमध्ये मानसिक आजार वेगाने वाढत आहे. न्यू हेल्थ अॅडव्हायजरमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, १८ वर्षापेक्षा अधिक वयाच्या लोकांनी एकूण झोपेतील निदान २० टक्के झोप ही चांगली झोप घ्यावी. वयस्कांसाठी कमीत कमी २ तास चांगली घेणं गरजेचं आहे. आपलं शरीर हे एकप्रकारची मशीन असतं, ज्याला सतत काम करणं शक्य नसतं. झोपेद्वारेच मांसपेशी रिचार्ज होतात.
नेचर ह्यूमन बिहेविअर नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, चांगली झोप घेतल्याने तुम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावातून बाहेर येऊ शकता. रिसर्चनुसार, जर तुम्ही रात्री चांगल्याप्रकारे झोपू शकत नसाल, तुमची तणावाची समस्या ३० टक्क्यांनी वाढू शकते. तुम्ही जेवढी जास्त चांगली झोप घ्याल, तेवढाच तुमचा मेंदू निरोगी राहिल. हा रिसर्च युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या सायकॉलॉजी विभाहाचे प्राध्यापक मॅथ्यू वॉकर यांनी लिहिला आहे.
महत्वाच्या नसलेल्या गोष्टी विसरण्यास मदत
'सायन्स' या जर्नलमध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, रात्री चांगली झोप घेतल्याने दिवसभरात झालेल्या अनावश्यक गोष्टी आणि घटना विसरण्यास मदत मिळते. मेंदूसाठी ज्या गोष्टी अनावश्यक असतात, झोपेदरम्यान मेंदू त्या गोष्टी काढून टाकतो. दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर तुम्हाला त्याच गोष्टी लक्षात राहतात, ज्या तुमच्यासाठी गरजेच्या असतात.