अहमदनगर : भारतीय महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हा आजार गंभीर स्वरूपाचा असला, तरी वेळेत निदान झाल्यास व योग्य औषधोपचार झाल्यास हा आजार संपूर्ण बरा होऊ शकतो. मात्र, या आजाराचे लक्षण लवकर लक्षात येत नसल्याने अनेक अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे महिलांनी याबाबत सजग राहावे, २० वर्षांवरील सर्व महिलांनी ‘सेल्फ ब्रेस्ट एग्झॅमिनेशन’ म्हणजेच स्तनाची स्वतः तपासणी करणे आवश्यक आहे. असे मत कर्करोग तज्ज्ञांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.
साधी गाठ म्हणून दुर्लक्ष नकोस्तनामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ किंवा सूज आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्तनावर अचानक अल्सर्स येऊ लागल्यास किंवा स्तनावरील त्वचेचा रंग अचानक बदलू लागल्यासही वैद्यकीय सल्ला घ्यावा. कोणत्याही प्रकारच्या कर्करोगामध्ये सतत थकवा जाणवणे, अचानक वजन कमी होणे ही लक्षणे दिसून येतात. हे लक्षणे स्तनाच्या कर्करोगाच्या बाबतीतही जाणवतात.
ही आहेत स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे- स्तनाच्या ठिकाणी कठीणपणा किंवा गोळा येणे.- स्तनाच्या ठिकाणी सूज किंवा बारीक खळगा पडणे.- स्तनाच्या ठिकाणी न थांबणारी खाज.- स्तनाग्र किंवा त्याच्या बाजूच्या भागात पांढरेपणा किंवा तांबूसपणा- स्तनाच्या आकारात लक्षणीय बदल.- स्तनाग्रातून स्राव वाहणे.- स्तनाच्या आतील ग्रंथी स्पष्टपणे दिसणे- स्तन लालसर किंवा अतिसंवेदनशील होणे
तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या...स्तनाच्या कर्करोगाची वेगवेळी कारणे आहेत. २० वर्षांवरील सर्व महिलांनी ‘सेल्फ ब्रेस्ट एग्झॅमिनेशन’ म्हणजेच स्तनाची स्वतः तपासणी करणे आवश्यक आहे. या दरम्यान स्तनाला गाठ अथवा इतर काही लक्षणे आढळून आली तर तत्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेत निदान झाल्यास व योग्य औषधोपचार झाल्यास हा आजार संपूर्ण बरा होऊ शकतो.- डॉ. दत्तात्रय अंधरे, कर्करोग तज्ज्ञ, अहमदनगर