मुंबई : आजारपणात अवाढव्य येणारा खर्च याचा कधी ना कधी फटका बसतो. यामुळे आरोग्य विमा काढण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. मात्र, हा विमा काढण्याची वयोमर्यादा लक्षात घेता वयाची काही बंधने पाळल्यास तो आणखी फायद्याचा ठरू शकतो. तिशी गाठायच्या आधीच आरोग्य विमा काढल्यास नेहमी चांगले असते, कारण कोणत्याही मेडिकल इमरजन्सीला तोंड देणे सोपे जाते. बऱ्याचदा सल्लागार लोकांना कमी वयातच आरोग्य विमा काढण्यास सांगतात. ते असे का सांगतात, याची पाच कारणे आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
1) जेवढे लवकर कमी वयात तुम्ही आरोग्य विमा खरेदी कराल तेवढा त्याच्या प्रिमिअम कमी बसणार आहे. जर तुम्ही 25 व्या वर्षी आरोग्य विमा खरेदी करत असाल तर 5 हजार रुपये वार्षिक द्यावे लागतील. तर 35 व्या वर्षी हिच रक्कम जवळपास 6 ते 8 हजाराच्या घरात जाईल.
2) आरोग्य विमा कधीही काढणे फायद्याचे असते कारण आजारपण कधी सांगून येत नाही. अचानक एखादा आजार उद्भवल्यास उपचारांसाठी लाखो रुपये लागतात. आरोग्य विमा असल्यास एवढे पैसे गोळा करण्याचा तणाव राहणार नाही.
3) आरोग्य विमा कमी वयात खरेदी केल्याचा आणखी एक महत्वाचा फायदा असा की जर तुम्हाला पहिल्या वर्षी आजारीपण आलेच नाही तर पुढील वर्षी नुतनीकरण करताना तुमच्या विम्याची सुरक्षा रक्कम वाढते. यालाच बोनस म्हणतात. म्हणजेच जर तीन लाखांचा विमा असेल तर पुढील वर्षी कमी प्रिमिअममध्ये हा विमा 4 किंवा 5 लाखांचा होतो.
4) बरेचजण नोकरी करत असलेली कंपनी देत असलेल्या विम्यावरच अबलंबून राहतात. मात्र, नोकरीत बदल झाल्यास हे कव्हर जाते. अशा वेळी कुटुंबात आजारपण आल्यास त्याचा फटकाही बसू शकतो. तसेच या कंपन्या 50 हजारांपासून 5 लाखांपर्यंत विम्याचे संरक्षण देतात, जे भविष्यात कमी पडू शकते. यामुळे खासगी विमाही काढलेला फायद्याचा ठरतो.
5) कमी वयात विमा घेतल्यास पत्नीच्या प्रसुतीवेळीही तो फायद्याचा ठरतो. कारण बऱ्याच आरोग्य विम्यामध्ये प्रसुतीसाठी वेटिंग पिरिएड असतो. हा काळ 3 ते 5 वर्षांचा असू शकतो. 25 व्या वयामध्ये आरोग्य विमा घेतल्यास त्याचा फायदा 28 व्या वर्षापासून मिळू शकतो. महत्वाचे म्हणजे प्रसुतीचा खर्च वाचल्य़ास गेल्या तीन वर्षांतील प्रिमियमही त्यातून भरून निघतो.