- डॉ. दीपक कुलकर्णी(लेखक त्वचारोगतज्ज्ञ आहेत.)
लहान मुलांची त्वचा प्रौढांपेक्षा पातळ व नाजूक असते, तसेच त्यांची प्रतिकारशक्तीही कमी असल्यामुळे लहान-मोठ्या रोगांना ते बळी पडण्याची शक्यता फार मोठी असते. दुर्दैवाने त्वचेच्या योग्य निगेबद्दल पुरेशी शास्त्रशुद्ध माहिती समाजात प्रचलित नसल्याने अनेक अडचणी येतात. ही माहिती कळावी यासाठी हा लेखप्रपंच.त्वचेची स्वच्छता : साबणाचे काम त्वचेतील अनावश्यक तेलकटपणा काढून टाकणे व रोगजंतूंना आटोक्यात ठेवणे होय. कोणत्याही सर्वसाधारण साबणामुळे बहुतांशी रोगजंतू नाहीसे होतात व तेलकटपणा कमी होतो. त्वचेवरील सर्वच जंतूंना मारून टाकण्याची व त्वचा पूर्णपणे 'निजंर्तुक' करण्याची मुळात काहीच आवश्यकता नसते. बरेच जंतू त्वचेवर नैसर्गिकरीत्या निवास करतात व ते निरुपद्रवी असतात. त्यामुळे दिवसातून एकदा सर्वसाधारण साबणाने अंघोळ घालणे पुरेसे आहे. त्यामुळे डॉक्टरांनी खास सल्ला दिला असल्याशिवाय, उगाचच जाहिराती पाहून, नियमित वापरासाठी कोणताही औषधी साबण वापरणे गैर आहे. उलटपक्षी अशा औषधी साबणामुळे त्वचेच्या कोरडेपणात वाढ होऊ शकते व त्वचेची उन्हाला तोंड देण्याची क्षमताही कमी होऊ शकते. ज्या बालकांना वारंवार त्वचेवर जंतुसंसर्ग होत असेल तेवढ्यांनाच डॉक्टरांच्या सल्ल्याने जंतुनाशक साबण अथवा असे द्रव्य वापरावे.थंडीमध्ये, कोरड्या कातडीसाठी असलेले साबण आपण बाळांना वापरू शकतो. अशा साबणांमध्ये स्निग्धता जास्त असते व त्यामुळे त्वचेला दाह होत नाही. हल्ली २८ल्लीि३ ुं१२ नावाच्या अल्कलीविरहित वड्या मिळतात. या महाग असल्या तरी तीव्र कोरडेपणावर फार उपयुक्त ठरतात. लहान मुलांना बऱ्याच वेळा डाळीच्या पिठाने अंघोळ घातली जाते. पिठामुळे तेलकटपणा जरी कमी होत असला तरी त्यातील जाडसर कणांमुळे त्वचेला इजा होण्याची शक्यता असते. तीव्र कोरडेपणावर स्वस्तातील उपाय म्हणजे साबण न वापरता फक्त पाण्याने अथवा दुधाने मालीश करून स्नान घालणे. पीठ वापरावयाचे असेलच तर ते वस्त्रगाळ असावे व दुधात मिसळून वापरावे. पिठाच्या वापरामुळे लव फक्त तात्पुरती जाते, कायमची नाही, हे ठाऊक असले पाहिजे. अंघोळीनंतर कातडीच्या घडीमध्ये (जांघ/काख/मान) साबणाचा अंश अथवा ओलसरपणा राहू देऊ नये. अन्यथा त्या ठिकाणी चोळण अथवा डायपर रॅश असे विकार होऊ शकतात. ओलसरपणा पुसताना मऊ टॉवेलने अंग टिपून घ्यावे. कातडीवर पडणाºया घड्या नीट उघडून ओलसरपणा राहणार नाही याची काळजी घ्यावी. पावडरमुळे त्वचा सुकी राहण्यास मदत होते. त्यामुळे कातडीच्या घड्यांमध्ये साधी पावडर टाकायला हरकत नाही. पावडर टाकण्यापूर्वी त्वचा पूर्ण कोरडी करून घ्यावी. शक्यतो स्टार्चविरहित पावडरच वापराव्यात. कारण त्यांच्यामुळे क्वचित बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. बाळाची नखे फार वेगाने वाढतात. ती वेळोवेळी कापावीत. डोक्याला सौम्य शाम्पू वापरावा. साबणही वापरला तरी चालेल. अंघोळीनंतर केसाला तेल लावण्यास काही हरकत नाही.
तेल मालीश : अंघोळीपूर्वी तेल मालीश केल्याने बाळाची त्वचा मऊ राहते असे मानले जाते. तसेच आईने असे मालीश केल्यास माता व बालकांमधला भावनिक बांध पक्का होण्यास मदत होते. खेळकर बाळांना मालीशमुळे अंग रगडल्याने आराम मिळतो व झोप शांत लागते; परंतु कोरड्या त्वचेचा त्रास असणाºया बालकांना मात्र आपली ही पद्धत काही प्रमाणात त्रासदायक ठरू शकते. खरेतर अंघोळीपूर्वी मालीश केल्यामुळे तेलाचा जो थर त्वचेवर निर्माण होतो, त्यामुळे अंघोळी वेळी ओतले जाणारे पाणी कातडीमध्ये शोषले जाऊ शकत नाही. त्यामुळे अशा बालकांची त्वचा तेलामुळे बाहेरून तुकतुकीत; पण आतून शुष्क राहते. त्यामुळे कोरडेपणाशी संबंधित असणारे अटोपीक डमार्टायटिससारखे विकार बळावू शकतात, त्यामुळे मालीश करत असताना आपल्या बाळाची त्वचा कोरडी पडत नाही ना याचे भान ठेवले पाहिजे. अन्यथा अर्धी अंघोळ झाल्यावर बाथरूममध्येच आईने मालीश उरकून घ्यावे व उरलेली अंघोळ घालावी. असे केल्याने काही प्रमाणात तरी पाणी कातडीत जिरायला मदत होईल. माझा हा सल्ला घरातील वरिष्ठ मंडळींना विचित्र वाटेल; पण अंघोळीपूर्वीच्या मालीशमुळे कोरड्या कातडीशी संबंधित विकार बळावू शकतात, असा आम्हा त्वचारोगतज्ज्ञांचा अनुभव आहे.डायपरचा वापर : डायपर कितीही उच्च प्रतीचा असला तरी त्याने शोषलेला ओलसरपणा शेवटी तिथेच असतो. त्यामुळे मूत्र, शौच व घाम व डायपरवर राहणारा ओलावा यामुळे त्वचेला सातत्याने दाह होत असतो. त्यामुळे डायपर रॅश होऊ शकतो व यामुळे वैद्यकीय सल्ल्याची गरज पडू शकते. म्हणून डायपरचा वापर शक्य तितका कमी करावा. घरात लंगोट वापरावा व तो वेळोवेळी बदलावा. लंगोट ओला झाल्यास प्रथम ओल्या कपड्याने व नंतर कोरड्या व मऊ कपड्याने नाजूकपणे पुसून घ्यावे. यासाठी जंतुनाशक द्रव्ये वापरू नयेत. या सर्व निगेनंतरही बाळाला त्वचेचा कोणताही विकार झाल्याचे आढळल्यास आपले फॅमिली डॉक्टर, त्वचारोगतज्ज्ञ अथवा बालरोगतज्ज्ञ यांचा सल्ला घ्यावा.कपडे : लोकरी व कृत्रिम धाग्याच्या कपड्यांमुळे कोरड्या कातडीचा दाह वाढतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये लोकरी कपडे घालण्यापूर्वी आतून सुती कपडे घालणे श्रेयस्कर ठरेल. उन्हाळ्यात ढिले व सुती कपडे घालावेत. बालकांना घातल्या जाणाºया विविध 'डिझायनर' कपड्यातील लेस, खडे इ. गोष्टींमुळेही बाळाच्या त्वचेला अकारण टोचून दाह होऊ शकतो.