- डाॅ.अरुणा तिजारे
माझ्या कार्य शाळेत मी बरेचदा एक प्रश्न विचारते .. तुमच्या मते जीवन म्हणजे काय ?या प्रश्नावर विविध उत्तरे मिळतात …. कोणी म्हणतो जीवन एक संघर्ष आहे कोणाला जीवन एक प्रवास वाटतो. तर कोणाला ते एक न सुटणारं कोडं वाटतं खरंच जीवनाची अशी एखादी व्याख्या आहे का? चार आंधळ्यांनी केलेल्या हत्तीच्या वर्णनासारख्याच आपल्या ह्या कल्पना आहेत . आणि आपण प्रत्येक जण आपापापल्या कल्पने प्रमाणे जगत असतो . मला जीवन एका महासागरासारखे वाटते . आणि या महासागरातून सुखरूप आपल्या ध्येयापर्यंत पोहचायला कौशल्याची गरज आहे .कौशल्य - सतत समतोल राखण्याचं!कसं जगणं तोलाचं ? .... यशाचं का शांतीचं ?कसं जगणं मोलाचं ?.... धनाचं का समाधानाचं ?कसं जगणं सुखाचं ?.... ध्येयाचं का मुक्तीचं ?कसं जगणं युक्तीचं ?.... महात्वाकांक्षेमागे धावण्याचं का आंतरिक गाभा मिळवण्याचं ? प्रश्न! प्रश्न !! प्रश्न !!! अनंत प्रश्न आणि अनंत उत्तरं !एका तागडीत या जगातील यश, समृद्धी तर दुसऱ्या तागडीत आनंद, समाधान, शांती. कसं जगणं तेलाचं ? आणि तोलणार कोण? या दोन्हीचा समतोल शक्य आहे का? आपण सगळेच सतत हा समतोल साधायची कसरत करत असतो पण हे कौशल्य मात्र काही जणांनाच जमतं .दाही दिशांनी वेगवेगळ्या अपेक्षा आपल्याला ओढत असतात . एकीकडे कुटुंबियांच्या अपेक्षा, नातेसंबंधांची भावनिक गुंतागुंत , दुसरीकडे आपल्या स्वतः कडून असलेल्या अपेक्षा, आणि ह्या अपेक्षा ज्या समाजात पूर्ण करायच्या आहेत त्या समाजाच्या अपेक्षा . एकीकडे समाजातील जीवघेणी स्पर्धा - मुलांचं मार्कांसाठी धावणं , नोकरी करणाऱ्यांची बढतीसाठी शर्यत आणि धडपड, गृहिणींची घर, मुलं, नवरा सांभाळतांना उडणारी तारांबळ. ह्या सगळ्यात भर म्हणून मानसिक गोंधळ - पैश्याच्या मागे लागणं वाईट पण पैसा तर मिळवायलाच हवा - मग तो अगदी न आवडणारी नोकरी करून मिळवावा लागला तरी महत्वाकांक्षा जास्त ठेवली तर नातेसंबंध नाराज होतात . एक जीव करणार तरी काय काय?... त्यात हा तोल सांभाळतांना येणारा ताणतणाव जर नियंत्रित नाही केला तर शारीरिक आणि मानसिक आजारपणांना आमंत्रण . मानसोपचार तज्ञ म्हणतात ,९०% आजारपणं ताणामुळे उद्भवतात . वोट्सअप वर सुविचार, ज्ञानाचे पाठ पुढे ढकलणं, फॉरवर्ड करणं सोपं आहे हो, पण प्रत्यक्षात आचारायला केव्ह्ढ्या तरी अडचणी !!!मग या कोषातून बाहेर पडण्याचा मार्गच नाही कां ? यश, संपत्ती बरोबरच आनंद, समाधान, शांती शक्य आहे का? हो आहे ! तेच तर कौशल्य, कसरत आहे . हे कौशल्य कोणालाही शिकता येतं आणि सरावाने त्यात प्रावीण्य सुद्धा मिळवता येतंया कोषातून बाहेर पडण्यासाठी 'मी ' च ज्ञान घेणं आवश्यक आहे. आपला समाज असतो मी म्हणजे मला आरश्यात दिसते तेव्हडीच मी- माझे गुण , अवगुण ,इच्छा आकांक्षा !!! आणि मग याच मी कडून आपण सगळीकडे पुरे पडण्याचा प्रयत्न करतो . पण खऱ्या अर्थानी मी हा थ्री डिमेंशनल आहे . माझं शरीर, माझं मन , आणि माझा आत्मा . मन आणि आत्मा दिसत नसले तरी ते दोन मिळून ९९% व्यक्तिमत्व घडत असतं आणि जोपर्यंत आपण ह्या तिन्हींची सतत समप्रमाणात प्रगती ( डेव्हलपमेंट ) करत नाही तोपर्यंत यश, समृद्धी + आनंद , समाधान याच गणित काही सुटत नाही . या तिन्हींची सतत प्रगती म्हणजे काय आणि ती कशी करायची? शरीराची (निगा) प्रगती -योग्य आहार, योग्य व्यायाम, आणि योग्य आराम यांनी होते तर मनाची प्रगती- नवीन ज्ञान मिळवुन , वाचन, मनन, चिंतनानी होते आत्मिक प्रगतीसाठी -ध्यान , धारणा, स्वः जागरूकता ( सेल्फ अवेरनेस ), सतत जाणीव पूर्वक जगण्या मुळे होते. या तिन्हींचा कुठेही समतोल ढळला तरी त्याचे परिणाम जीवनात आजारपण, अपयश, निराशा ह्या रूपात दिसतात . तेव्हा आजच ठरवून टाका कि ह्या थ्री डिमेन्शनल मी ची प्रगती मी जीवनावर न सोपवता माझ्या हातात घेणार .