कोरोना व्हायरसमुळे देशातील सर्वच शाळा बंद आहेत. इतके दिवस शाळा बंद असल्या कारणाने संवेदनशील लहान मुलांच्या आरोग्यावर फार वाईट प्रभाव पडत आहे. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, शाळा बंद असल्याने लहान मुलांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच अनेक मुले परीक्षा रद्द झाल्याने आणि मित्रांना समोरा समोर भेटता येत नसल्याने वैतागलेले आहेत.
रोजचं रुटीन गडबडल्या कारणाने लहान मुलांच्या मेंदूवर वाईट प्रभाव पडतो आहे. यावर सायकोथेरपिस्ट यांचं मत आहे की, जर लॉकडाउन जास्त वेळ असाच सुरू राहिला तर लहान मुला-मुलींना अनेक मानसिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेत तर अनेक लहान मुलांना किंवा त्यांच्या पालकांनी चाइल्डलाइनकडे मदत मागितली आहे.
या कारणाने मुलांमध्ये वाढतोय तणाव
परीक्षा रद्द झाल्याने पुन्हा तयारी करावी लागेल या विचाराने अनेकजण चिंतेत आहेत. मानसिक आरोग्य तज्ज्ञ नताशा डेवन यांनी सांगितले की, 'ही जनरेशन अशा गोष्टींशी जुळून राहत असते ज्या गोष्टींना ते नियंत्रित करू शकतील. यात शरीराचा आकार आणि शैक्षणिक प्रदर्शन याबाबत अग्रेसिव्ह व्यवहार बघितला जाऊ शकतो. परीक्षा रद्द झाल्याने अनेक मुले तणावग्रस्त झाले आहेत.
पालकांच्या भांडणांमुळे...
लॉकडाउनमुळे आई-वडील पूर्णवेळ घरातच राहतात. याबाबत तज्ज्ञ एलिसन यांनी सांगितले की, जास्तीत जास्त मुले शाळांमधून मिळत असलेल्या समर्थनापासून दूर झाले आहेत आणि घरात आई-वडिलांच्या वाढत्या भांडणांमुळे त्यांचा तणाव वाढत आहे. अशात मुलांमध्ये एकटेपणाची भावना घर करून जाते. जी मुलं आधीच तणावात आहेत, त्यांच्यासाठी ही वेळ फारट घातक ठरू शकते.
काय करता येतील उपाय?
तज्ज्ञांचं मत आहे की, शाळा लहान मुलांसाठी लाइफलाईनसारखी काम करते. लहान मुलांना शाळेपासून जास्त दूर ठेवल्याने त्यांची चिंता वाढू शकते. यावेळी लहान मुलांचं काउन्सेलिंग करणं फार गरजेचं आहे. त्यासोबतच ऑनलाइन क्लासेसच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास सुरू ठेवला तर त्यांचा तणाव कमी होऊ शकतो. त्यांच्याशी पालकांनी शांतपणे बोलून त्यांचा तणाव कमी केला जाऊ शकतो किंवा त्यांना काहीतरी नवीन शिकवण्याचा प्रयत्न केला तर ते त्यात व्यस्त राहतील.
मोठ्या मुलांचं जास्त नुकसान
द असोसिएशन फॉर चाइल्ड सायकोथेरपिस्टच्या तज्ज्ञ एलिसन रॉय म्हणाल्या की, शाळा जास्त काळासाठी बंद राहणं हे मोठ्या मुला-मुलींसाठी अधिक नुकसानकारक आहे. यामुळे त्यांच्यात लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होत आहे. तसेच लहान मुलेही त्यांच्या समान वयाच्या मित्रांसोबत खेळू शकत नाहीयेत. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक दबाव वाढत आहे.
याचकारणाने सर्वच मुलांना ऑनलाइन दुनियेचा आधार घ्यावा लागत आहे. जी मुलं आधीच थोडं कमी बोलतात किंवा फार कुणात मिसळत नाहीत त्यांना समस्या अधिक होऊ शकते. यांना जास्त मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे.