(Image Credit : Healthcare Global)
एचआयव्ही एड्स रूग्णांवर उपचार आणि संशोधन करणाऱ्या क्षेत्राला एक मोठं यश मिळाल्याचं बोललं जात आहे. द टेलिग्राफ डॉट को डॉट यूके ने दिलेल्या वृत्तानुसार डॉक्टरांनी दावा केला आहे की, लंडनच्या एका एचआयव्ही पॉझिटीव्ह व्यक्तीला सेल ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून एड्स वायरसपासून मुक्त करण्यात आलं आहे. यात जर तथ्य असेल तर एड्स आजारातून बरा झालेला हा जगातला दुसरा व्यक्ती ठरेल. पहिला व्यक्ती हा एक जर्मन व्यक्ती होता, त्याला बर्लिन पेशेंट म्हणूनही ओळखले जात होते. हा व्यक्ती २००८ मध्ये एड्स मुक्त झाल्याचे सांगण्यात आले होते.
सध्या लंडनच्या या रुग्णाचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. या रुग्णाला तो एचआयव्ही पॉझिटीव्ह असल्याचं २००३ मध्ये कळालं होतं, पण त्याने २०१२ मध्ये या इन्फेक्शनवर उपचार घेणे सुरू केलं होतं. या व्यक्तीला २०१२ मध्ये Hodgkin lymphoma हा कॅन्सर झाला होता. यावर २०१६ मध्ये स्टेम सेल ट्रान्सप्लांटच्या माध्यमातून उपचार सुरू करण्यात आला.
अनोखा डोनर
या व्यक्तीच्या कॅन्सरवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना स्टेम सेलचा एक असा डोनर मिळाला, ज्याच्या शरीरात एक जीन परिवर्तन झालं होतं. जे नैसर्गिक रूपाने एचआयव्ही विरूद्ध प्रतिरोधक क्षमता पुरवतं. हे कळाल्यावर डॉक्टरांना वाटलं की, कॅन्सरसोबतच या व्यक्तीचा एचआयव्हीवर सुद्धा उपचार होऊ शकतो. हे जीन म्यूटेशन(परिवर्तन) उत्तर यूरोपमध्ये राहणाऱ्या केवळ एक टक्के लोकांमध्ये असतं. १८ महिन्यांनंतरही एड्स आढळला नाही
या ट्रान्सप्लांटमुळे लंडनच्या या रुग्णाची संपूर्ण प्रतिरक्षा प्रणालीच बदलली आहे. त्यानंतर या व्यक्तीने स्वेच्छेने एचआयव्हीची औषधे घेणे बंद केले. जेणेकरून हे जाणून घेता येईल की, एड्स वायरस पुन्हा तर सक्रीय होत नाही ना. सामान्यपणे औषधे बंद केल्यावर दोन ते तीन आठवड्यात वायरस पुन्हा सक्रिय होतो. पण इंग्लंडच्या रुग्णाचं असं झालं नाही. औषधे बंद केल्यावर १८ महिने लोटले तरी सुद्धा त्याच्या शरीरात एड्स वायरस आढळला नाही. याबाबत रिसर्च सायन्स जर्नल 'नेचर'मध्ये प्रकाशित झाला आहे.