Hepatitis In Children : हेपेटायटिस म्हणजेच यकृतामध्ये येणारी सूज, त्यामुळे होणारा दाह. लहान मुलांच्या बाबतीत या आजारावर तातडीने, योग्य ते उपचार न केले गेल्यास गंभीर, दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. भारतामध्ये हेपेटायटिसचे सर्वात जास्त आढळून येणारे कारण म्हणजे हेपेटायटिस बी आणि आपल्या देशात हेपेटायटिस बीचा संसर्ग सर्वात जास्त प्रसूतीच्या वेळेस पसरतो. हा आजार जन्माच्या वेळी आईकडून बाळाकडे पसरतो. हेपेटायटिसचे परिणाम हे त्याच्या विषाणूचा प्रकार (ए, बी, सी, डी किंवा ई), संसर्गाची तीव्रता, उपचार किती लवकर किंवा उशिरा केले गेले आणि उपचारांची प्रभावशीलता तसेच बाळाचे एकंदरीत आरोग्य यावर अवलंबून असतात. हेपेटायटिसच्या संभाव्य दीर्घकालीन परिणामांबाबत काही महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत.
1. क्रोनिक हेपेटायटिस
- हेपेटायटिस बी आणि सी: यामध्ये विषाणू दीर्घकाळपर्यंत शरीरात राहतो आणि यकृताला नुकसान पोहोचवत राहतो.
- क्रोनिक हेपेटायटिसमुळे यकृताचे दीर्घकाळ नुकसान होत राहते, त्यामुळे फायब्रोसिस (यकृतामध्ये चट्टे होणे), सिरोसिस (यकृतामध्ये गंभीर जखमा होणे) आणि यकृताचा कॅन्सर (हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा) असे आजार होऊ शकतात.
2. यकृताचे कार्य
- क्रोनिक हेपेटायटिसमुळे यकृताच्या कार्यात अडथळे येतात. शरीरातील अनेक कार्यांसाठी यकृत आवश्यक आहे, रक्तातून विषारी द्रव्ये काढून टाकणे, पचनाला मदत करणे आणि ऊर्जा साठवणे अशी कामे यकृत करत असते.
- यकृताचे कार्य नीट चालत नसेल तर कावीळ, जलोदर (उदरपोकळीत द्रव जमा होणे) आणि एन्सेफेलोपॅथी (यकृत निकामी झाल्यामुळे मेंदू नीट काम न करणे) अशा आरोग्याच्या गुंतागुंतीच्या समस्या होऊ लागतात.
3. वाढ आणि विकास
- पोषकद्रव्ये शरीरात शोषली जावी आणि स्नायू व हाडांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी यकृत खूप महत्त्वाची भूमिका बजावते. लहान मुलांना क्रोनिक हेपेटायटिस असल्यास त्यांची वाढ व विकास उशिरा होतो.
4. रोगप्रतिकार यंत्रणा
- क्रोनिक हेपेटायटिसचा शरीराच्या रोगप्रतिकार यंत्रणेवर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो. यकृत रोगप्रतिकार करणारे घटक तयार करत असते, तसेच रक्तप्रवाहातून जंतू काढून टाकण्याचे काम देखील यकृत करते.
- रोगप्रतिकार यंत्रणेचे कार्य नीट चालत नसेल तर मुलांना कोणतेही संसर्ग व इतर आजार पटकन होतात.
5. मानसिक आरोग्य
- कोणत्याही जुनाट आजारामुळे मुलाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. नैराश्य येते, मूल इतरांमध्ये मिसळायला उत्सुक नसते, वेगळे राहते. कोणत्याही दीर्घकालीन आजाराला सहन करणे हे मूल आणि संपूर्ण कुटुंबासाठी जिकिरीचे असते.
6. जीवनाची गुणवत्ता
- सततचे वैद्यकीय उपचार, सतत डॉक्टरांकडे जावे लागणे आणि क्रोनिक हेपेटायटिसचे शरीरावर दिसून येणारे परिणाम यामुळे मुलाची जीवन गुणवत्ता खालावते. शारीरिक हालचालींवर निर्बंध येतात, विशेष आहार द्यावा लागतो. अशा मुलांवर भावनिक परिणाम देखील होतो, ताणतणाव आणि बराच काळ आजारी राहावे लागण्याचे मानसिक ओझे सहन करावे लागते.
7. यकृताचे प्रत्यारोपण
- गंभीर केसेसमध्ये जर यकृताचे प्रचंड नुकसान झालेले असेल व यकृताचे कार्य अजिबात नीट होत नसेल तर यकृताचे प्रत्यारोपण करावे लागू शकते. या शस्त्रक्रियेमध्ये नुकसान झालेले यकृत काढून त्याजागी निरोगी यकृत बसवले जाते. यकृताचा आजार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असेल आणि यकृत पूर्णपणे निकामी झाले असेल तर हा त्यावरील उपचार पर्याय आहे.
आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी आणि आजार लवकरात लवकर लक्षात यावा यासाठी हे करता येईल:
लसीकरण: हेपेटायटिस ए आणि बीची लस उपलब्ध आहे, हे लसीकरण विषाणूविरोधात प्रभावी ठरू शकते.
सुरक्षित सवयी: स्वच्छतेच्या चांगल्या सवयींचे पालन करा - हात वारंवार धुण्याची सवय तुमचे हेपेटायटिस एच्या संसर्गापासून रक्षण करू शकते.
रक्ताची सुरक्षितता: हेपेटायटिस बी आणि सी पसरू नये यासाठी रक्त संक्रमणाच्या सुरक्षित प्रथांचे पालन करा.
नियमित तपासणी: फुल टाइम स्पेशालिस्ट सिस्टीम असणाऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांकडून नियमितपणे शारीरिक तपासणी व रक्त तपासणी करून हेपेटायटिस खूप आधीच लक्षात येऊ शकतो, तातडीने उपचार केले जाऊ शकतात. गरोदर महिलांमध्ये आजार लवकरात लवकर लक्षात आला आणि त्यावर योग्य उपचार केले गेले तर बाळाला हेपेटायटिस बीचा संसर्ग होण्याचे टाळता येते.
हेपेटायटिसच्या बाबतीत प्रत्येक मुलामध्ये दिसून येणारे परिणाम, एकंदरीत अनुभव यामध्ये बरीच तफावत असू शकते. आजार लवकरात लवकर लक्षात येणे, त्यावर योग्य उपचार होणे आणि सातत्यपूर्ण साहाय्य हे सर्व आजार बरा करून त्याचे दीर्घकालीन परिणाम टाळण्यासाठी आवश्यक आहे.
(डॉ सोमनाथ चट्टोपाध्याय, कन्सल्टन्ट आणि विभाग प्रमुख, हेपॅटो-पॅनक्रियाटो-बिलियरी सर्जरी व लिव्हर ट्रान्सप्लान्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई)