Lung health Tips : कोरोना महामारी आणि वाढत्या प्रदूषणामुळे फुप्फुसं कमजोर होत आहेत आणि यामुळे श्वास भरून येणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशा समस्या लोकांमध्ये वाढत आहेत. फुप्फुसं म्हणजे लंग्स आपल्या शरीरातील महत्वाचे अवयव आहे आणि तुम्ही काय खाता याचाही फुप्फुसाच्या आरोग्यावर प्रभाव पडतो. अनहेल्दी डाएटमुळे फुप्फुसं कमजोर होऊ शकतात. चला जाणून घेऊ फुप्फुसं निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या पदार्थांना दूर ठेवलं पाहिजे.
जास्त प्रमाणात मीठ खाऊ नये
मीठ हे जवळपास सर्वच पदार्थांमध्ये असतं. याशिवाय अनेक पदार्थांना चवच येत नाही. अनेकांना सवय असते की, जेवणात मीठ कमी असेल तर लोक वरून मीठ घेतात. पण तुम्हाला हे माहीत असायला हवं की, जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने फुप्फुसाचं नुकसान होतं. त्यामुळे मिठाचं सेवन कमी प्रमाणात करा आणि पॅकेज्ड फूडमध्ये मिठाचं प्रमाण जास्त असतं अशात ते पदार्थ खाणं टाळा.
तळलेले पदार्थ
तेल-मसाल्याचं जास्त सेवन केल्यानेही फुप्फुसाला नुकसान पोहोचतं. अलिकडे तळलेले किंवा मसालेदार पदार्थ बाहेर मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. अनेकांना तर तळलेले पदार्थ रोज खायला हवे असतात. पण फुप्फुसाचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर तळलेले आणि मसालेदार पदार्थ कमी खावीत.
स्वीट ड्रिंक्स
जास्त प्रमाणात शुगर असलेल्या ड्रिंक्सनेही फुप्फुसाला नुकसान पोहोचतं. याने वयस्क लोकांना ब्रोंकाइटिस होण्याची शक्यताही असते. अलिकडे शुगर असलेल्या ड्रिंक्सचं प्रमाण वाढलं आहे. तुम्हाला फुप्फुसं निरोगी ठेवायचे असतील तर शुगर असलेले ड्रिंक्स पिणं टाळा.
प्रोसेस्ड मीट
प्रोसेस्ड मीट प्रिजर्व करण्यासाठी वापरलं जाणारं नायट्राइट फुप्फुसात सूज आणि तणाव निर्माण करू शकतात. त्यामुळे याचंही सेवन टाळलं तर फुप्फुसं निरोगी आणि मजबूत राहतील.
दारू आणि तंबाखूचं सेवन
वरील काही पदार्थांसोबत फुप्फुसांना सर्वात जास्त नुकसान दारू आणि तंबाखूच्या सेवनाने होतं. दारूतील सल्फेटमुळे अस्थमाची लक्षणं वाढू शकतात. तेच इथेनॉल फुप्फुसाच्या कोशिकांना प्रभावित करतात. याने निमोनिया आणि फुप्फुसाशी संबंधित दुसऱ्या गंभीर समस्या होऊ शकतात.
(टिप- वरील लेखातील सल्ले किंवा टीप्स सामान्य माहितीवर आधारित आहे. काही रिसर्चमध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आम्ही कोणताही दावा करत नाही. अशात तुम्हाला काही समस्या असेल किंवा शंका असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा.)