(Image Credit : indiatimes.com)
बालपणी तुम्ही अनेकदा आजी-आजोबांकडून माणसाच्या डोक्यावर शिंग उगवण्याची कथा अनेकदा ऐकली असेल. पण कधी तुम्ही प्रत्यक्षात एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर शिंग पाहिलंय? नाही ना? पण मध्यप्रदेशाच्या सागर जिल्ह्यातील रहली गावातून अशी एक घटना समोर आली आहे. इथे राहणाऱ्या ७४ वर्षीय श्याम लाल यादव यांच्या डोक्यावर अनेक वर्षांपासून शिंग उगवलं होतं. हे शिंग ऑपरेशन करून कापण्यात आलं आहे. श्यामलाल यादव यांच्यानुसार, काही वर्षांपूर्वी डोक्यावर जखम झाल्यामुळे त्यांच्या डोक्यावर शिंग येऊ लागलं होतं.
श्याम लाल यादव सुरूवातीला हे जरा विचित्र वाटलं, पण नंतर याची त्यांना सवय झाली. अनेकदा त्यांनी डोक्यावरील शिंग कापलं, पण ते पुन्हा उगवत होतं. त्यानंतर वैतागून त्यांनी डॉक्टरांना हे दाखवलं. तेव्हा डॉक्टरांनीही हे शिंग पाहून हात वर केले होते. तर काहींनी यासाठी खूप पैसे लागतील असं सांगण्यात आलं होतं. अखेर सागर येथील भाग्योदय तीर्थ हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या टीमने श्याम लाल यांचं ऑपरेशन करून शिंग वेगळं केलं.
डॉक्टरांच्या टीमचं नेतृत्व करणारे डॉ. विशाल गजभिये यांनी सांगितले की, श्यामलाल यादव यांनी सेबासियस हार्न नावाचा आजार होता. याला डेविल्स हॉर्न असंही म्हटलं जातं. डॉ. गजभिये यांनी सांगितले की, आधी श्यामलाल यादव यांच्या डोक्याचा एक्स-रे आणि सिटी स्कॅन केला. जेणेकरून शिंग किती आतपर्यंत आहे हे कळावं. एक्स-रे मधून कळालं की, शिंगाचं मूळ फार खोलवर नाही. त्यानंतर ऑपरेशनचा निर्णय घेण्यात आला.
काही तासात हे ऑपरेशन झालं आणि श्याम लाल यादव यांच्या डोक्यावरील शिंग काढण्यात आलं. तसेच डॉक्टर गजभिये म्हणाले की, लवकरच ही केस इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरीमध्ये पब्लिश करण्यासाठी पाठवू. कारण अशी केस त्यांच्याकडे याआधी कधीही आली नव्हती.