- कुचला हा औषधी वृक्षांपैकी एक आहे. या वृक्षाची वाढ व विस्तार ओबडधोबड असते. वृक्ष साधारण १५ मीटर उंच वाढतो. या वृक्षाच्या पानांना एक प्रकारची चमक व दुर्गंधी असते. कुचल्याची फळे पेरूच्या आकाराची असतात. कुचल्याच्या फळाचे वैशिष्ट्य म्हणजे ते दिसायला आकर्षक व सुंदर असते. म्हणून या फळाला संस्कृतमध्ये ‘रम्यफळ’ असे म्हटले जाते. कुचला हे वृक्ष नक्षत्रवनातील अश्विनी नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. कुचल्याच्या सर्व भागात मूळ, खोड, साल, पाने, फुले, बिया अशा सर्वांमध्ये विष असते. जनावरांनी कुचल्याची पाने खाल्ल्यास त्यांचा मृत्यूही ओढवू शकतो. भारतात कोकण, मद्रास, केरळ, ओडिशात हा वृक्ष अधिक आढळतो. मानवी शरीरालाही हा वृक्ष अपायकारक ठरू शकतो; मात्र असे असले तरी काही औषधी गुणधर्म निसर्गाने कुचल्यामध्येच दिले आहे, हे विशेष! त्यामुळे कुचल्याला विषारी वृक्ष म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाही. वैद्यांच्या सल्ल्यानुसार कुचल्याचा औषधी वापर केल्यास निश्चित उपयुक्त ठरतो. कुचल्याचा औषधी उपयोग फुप्फुसाच्या आजारावर, निद्रेचे विकार, मज्जातंतूचे आजार, अशक्तपणा, बहिरेपणा, घटसर्प, मूत्राशयाचे विकार, आतड्यांचे विकार आदी रोगांमध्ये कुचल्याचा औषधी उपयोग होतो. हा वृक्ष तसा दुर्मीळ झाला असून, या वृक्षाचे जतन करणे काळाची गरज आहे. कुचला हे अत्यंत गुणकारी महत्त्वाचे औषधही आहे, हे विसरून चालणार नाही. मज्जातंतूच्या विकारामध्ये कुचल्यासारखे दुसरे कुठलेही उत्तेजन देणारे रामबाण औषध नाही. कुचला हे एक रसायन असून, नाडीसंस्था, पचनसंस्था, पोटदुखी, मूळव्याध, कृमिरोग, हृदयरोग, फुुप्फुसांची सूज आदींवरील औषधे या झाडापासून तयार केली जातात. कुचल्याचा औषधी वापर करण्यापूर्वी तो शुद्ध केला जातो. गोमूत्र, गाईच्या दुधाचा वापर कुचल्याच्या शुद्धतेसाठी वापरला जातो. इसबच्या रोगावरही हळद व कुचल्याच्या बिया उगाळून लावतात. त्याने इसबामधील रक्तस्त्राव त्वरित कमी होतो व जखम भरून येण्यास मदत होते. खाजही थांबण्यास सुरुवात होते व इसबच्या विकारापासून आराम मिळतो. कुचल्याचा औषधी वापर करण्यापूर्वी डॉक्टर व वैद्यांचा सल्ला अवश्य घ्यावा. परस्पर अन्य औषधी वनस्पतीप्रमाणे कुचल्याचा वापर करणे टाळावे.- कुसुम दहीवेलकर, सेवानिवृत्त वनाधिकारी--
फुफ्फुसाच्या आजारावर बहुगुणी वनौषधी कुचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:50 PM
कुचल्याच्या सर्व भागात मूळ, खोड, साल, पाने, फुले, बिया अशा सर्वांमध्ये विष असते. जनावरांनी कुचल्याची पाने खाल्ल्यास त्यांचा मृत्यूही ओढवू शकतो.
ठळक मुद्दे कुचला हा औषधी वृक्षांपैकी एक आहे.वैद्यांच्या सल्ल्यानुसार कुचल्याचा औषधी वापर निश्चित उपयुक्त