मुंबई : वर्षाखेरीस कोरोनासह साथीच्या आजारांचा कहरही कायम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाळी आजारांनी ग्रस्त रुग्णांचे प्रमाण यावर्षी १८ टक्क्यांनी वाढले आहे. मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोसह, कावीळ आणि स्वाइन फ्लू आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच २०२० च्या तुलनेत यावर्षी २०२१ मध्ये पावसाळी आजारांचे प्रमाण १८ टक्के वाढले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मलेरियाचे १३३, डेंग्यू ७४४, गॅस्ट्रो ४७७, कावीळ ३८, चिकनगुनिया ७८, एच १ एन १ २० रुग्ण वाढले. लेप्टोचीे रुग्ण कमी झाले आहेत.
मृत्यूचे प्रमाण कमीगेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मृत्यूचे प्रमाण ५८ टक्के कमी झाले आहे. मलेरिया १ वरून शून्य, लेप्टो ८ वरून ४ पर्यंत खाली आले आहे. डेंग्यूचे गेल्या वर्षी आणि याही वर्षी ३ मृत्यूची नोंद झाल्याने स्थिर आहे. तर चिकनगुनिया, कावीळ, एच १ एन १ आणि गॅस्ट्रोचे गेल्या दोन वर्षात एक ही रुग्ण दगावल्याची नोंद नाही.
पावसाळी आजारांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १८ टक्के रुग्णवाढ झाली आहे. त्यात सर्वाधिक डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ५७७ टक्के वाढ झाली आहे. त्याखालोखाल चिकणगुनिया ७८ टक्के, एच १ एन १ ४६ टक्के, गॅस्ट्रो १९ टक्के, कावीळ १४, मलेरिया ३ टक्के वाढ झाली आहे; मात्र लेप्टोच्या रुग्णसंख्या ७ टक्क्यांनी घटली आहे. यावर्षी मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याने दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी मलेरियाचे एकूण ५००७ रुग्ण होते. ते यावर्षी ५१४० झाले. डेंग्यू १२९ वरून ७७३, गॅस्ट्रो २५४९ वरून ३०२६, कावीळ २६३ वरून ३०१, चिकनगुनिया शून्यावरून ७८, एच १ एन १ ४४ वरून ६४ वर पोहचले. तर लेप्टोची रुग्णसंख्या काहीशी कमी होऊन २४० वरून २२४ पर्यंत खाली आली आहे.
आजार | २०२० | २०२१ |
---|---|---|
मलेरिया | ५००७ | ५१४० |
लेप्टो | २४० | २२४ |
डेंग्यू | १२९ | ८७३ |
गॅस्ट्रो | २५४९ | ३०२६ |
कावीळ | २६३ | ३०१ |
चिकनगुनिया | ० | ७८ |
स्वाइन फ्लू | ४४ | ४५ |
एकूण | ८२३३ | ९७०६ |