धनंजय कपाले
वाशिम : आंब्याचा भाव ८० रुपये किलोपर्यंत असला तरी एक ग्लास आंब्याचा रस केवळ १० रुपयांना विक्री केल्या जात असल्याचे चित्र वाशिम शहरासह जिल्हाभरात सगळीकडे बघावयाला मिळत आहे. हा रस केमिकल युक्त असून जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा हा विकृत प्रकार दुकानदारांकडून होत असल्याचे वास्तव सगळीकडेच बघावयाला मिळत आहे. परंतु अद्यापही आरोग्य विभाग असो अथवा अन्न व औषध प्रशासन विभाग असो यांचे याकडे सध्यातरी दुर्लक्ष असल्याने दुकानदारांची चांगलीच चांदी होत आहे.
केमिकल युक्त आंब्याच्या रसाची दुकाने वाशिम शहरात आंबेडकर चौक, शिवाजी हायस्कूल समोर, पोस्ट ऑफिस चौक परिसर, पाटणी चौक, रिसोड नाका , अकोला नाका आदी ठिकाणासह मुख्य बाजारपेठेत ही दुकाने थाटली गेली आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने अ वर्गाचे अधिकारी रोज त्या रस्त्यावरून जात आहेत, पण कोणीही वाहनातून खाली उतरून विचारायला तयार नाही की, हा आंब्याचा रस कसा बनवला जातो? इतकं स्वस्त कसं मिळतंय,हा प्रश्न विचारण्याची साधी तसदी अधिकारी वर्ग घेत नसल्याने दुकानदारांची हिंमत वाढली आहे. लोकमतच्या प्रतिनिधीने याचा तपास केला असता फक्त एक आंबा, दोन ग्लास साखरेचे द्रावण, चार ग्लास आमरस बर्फाचे तुकडे मिसळून तयार केल्याचे समोर आले. चमकदार रंग ग्राहकांना आकर्षित करता यावा यासाठी त्यात रंगीत रसायनेही मिसळली जात असल्याचे बघावयास मिळाले. आंब्याच्या रसाआड नागरिकांच्या शरीरात विष घालणाऱ्या दुकानदारांवर काय कार्यवाही होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
केमिकल युक्त आंब्याच्या रसाची दुकाने शोधून तेथील रसाची तपासणी करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आजच देतो. केमिकल युक्त आंब्याच्या रसाची विक्री करताना दुकानदार आढळला तर त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही निश्चितच करू - सागर तेरकर, सहायक आयुक्त,अन्न औषध प्रशासन, अकोला.