‘मसाला’ आणि ‘फिटनेस’ या शब्दांचा तसा छत्तीसचा आकडा. म्हणजे फिटनेस हवा असेल तर मसाले आणि मसालेदार खाण्यावर फुलीच मारायला हवी, असा एक समज असतो. मात्र, एका तासात शरीरातील ५०० ते ६०० कॅलरीज खर्च करणारा ‘एक मसाला’ सध्या फिटनेसच्या क्षेत्रात आला आहे. तो आहे ‘मसाला भांगडा’. नावावरून ही एखादी डिश किंवा केवळ नृत्य असेल, असं वाटतं. मात्र, भांगडा या उत्तर भारतीय ‘हाय एनर्जी’ लोकनृत्याला बॉलीवूडचा मसाला लावून फिटनेस मिळविणारा हा व्यायामप्रकार आहे.
५५ मिनिटांच्या वर्कआउटमध्ये आधी वॉर्म-अप, नंतर सुमारे ३५ मिनिटे ‘अॅड ऑन’ पद्धतीनं साधारण ७-८ मूव्ह्समध्ये कोरिओग्राफी शिकवणं आणि त्यानंतर ‘जॅम ऑफ कोरिओग्राफी’ म्हणजेच एकत्रितपणे पहिल्यापासून नृत्य, या क्रमानं शिकवलं जातं. जिम, एरोबिक्स, योगा यांच्यासोबतीनंच ‘मसाला भांगडा’ करता येतो, मात्र आठवड्यातून जास्तीत जास्त दोनदा तो करावा.
ट्रॅक पँट आणि टी शर्ट घालून वर्कआउट करताना अनेकदा स्त्रियांना अवघडल्यासारखं वाटतं, शिवाय आपल्याला ते शोभेल की नाही, अशीही चिंता असते. अशांसाठी ‘मसाला भांगडा’ एक उत्तम पर्याय ठरत असून पंजाबी सूट किंवा पटियाला घालूनही तो करता येतो. शूज घातले नाही तरीही चालतं.