- डॉ. ऋजुता सचिन हाडये
गोवर या आजाराला मराठीत गोवर, गोवरी, किंवा हिंदीमध्ये चेचक, छोटी माता तर इंग्रजमध्ये मीझल्स किंवा रुबिओला या नावाने ओळखतात. ताप व अंगावर उठणारे पुरळ ही गोवराची सर्वांना माहित असणारी ओळख आहे. गोवर हा आजार जगभर सर्वत्र कमीअधिक प्रमाणात आढळतो. जेव्हा एखाद्या लोकवस्तीत असंरक्षित म्हणजे लस न घेतलेल्या आणि कधीही गोवर न झालेल्या बालकांची एकत्र संख्या ऐकून बालसंख्येयच्या ४० टक्कयांहून अधिक असते, तेव्हा उद्रेक होत असल्याचे आढळतो. आपल्या देशात सार्वत्रिक लसीकरण होण्यापूर्वी वर्षाला अडीच लाख (२.४७ लाख १९८७) बालकांना गोवर होत असे. लसीकरणाचे प्रमाण वाढू लागल्यावर ही संख्या कमी होत गेली. २०१८ मध्ये भारतभरात २०,८९५ बालकांना गोवर झाला व त्यात ३४ बालकांचा मृत्यू झाला. कोरोना महामारीच्या काळात अनेक बालकांचे लसीकरण हुकले व सध्या गोवराने डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. त्यास नियंत्रणात आणायचे असेल तर हा आजार नीट समजून घेणे आवश्यक आहे.
गोवर कशामुळे होतो?
गोवर हा आर एन ए विषाणूजन्य आजार आहे. हा पॅरामिक्सोव्हायरस प्रकारचा विषाणू मानवी शरीराबाहेर तग धरू शकत नाही. गोवराच्या एका रुग्णाकडून इतर बालकांपर्यंत त्याचा प्रसार होतो. शिंका किंवा खोकल्यातून बाहेर पडणारे द्रावकण या विषाणूच्या संसर्गास कारणीभूत असतात. प्रत्यक्ष गोवराची लक्षण दिसून येण्याआधी आणि पुरळ उठण्याच्या सुरवातीच्या काळात हा संसर्गाचा जोर सर्वात जास्त असतो. पुरळ येण्यापूर्वी ४ दिवस व पुरळ उठल्यानंतरचे ४ दिवस संक्रमणाच्या दृष्टींने सर्वात महत्वाचे असतात. या काळात रुग्ण्याचे विलगीकरण आवश्यक ठरते. एकदा गोवर होऊन गेल्यास सहसा परत गोवर होत नाही.
गोवराचा प्रादुर्भाव ६ महिने ते ५ वर्ष वयोगटात सर्वाधिक आढळतो. गेल्या काही वर्षात त्याहून मोठ्या वयाच्या व्यक्तींमध्ये गोवराचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे. मुलामुलींमध्ये गोवर सारख्याच प्रमाणात आढळतो. लसीच्या मात्रा योग्य प्रमाणात घेतल्यास गोवरापासून संरक्षण मिळते. कुपोषित बालकास गोवर झाल्यास आजाराचे गांभीर्य मोठ्या प्रमाणात वाढते. कुपोषित बालकांमार्फत आजाराचा प्रसार दीर्घकाळ होतो. सर्वसाधारण बालकास गोवर झाल्यास त्याचे / तिचे वजन कमी होते व ते बाळ कुपोषित होऊ शकते.
विषुववृत्तीय प्रदेशात कोरड्या हवामानात विषाणू जास्त पसरतो, तर समशीतोष्ण प्रदेशात गोवर हिवाळ्यात जास्त आढळतो. भारतात जानेवारी ते एप्रिल महिन्यांमध्ये गोवराचे प्रमाण जास्त आढळून येते. मात्र विषाणूस संधी मिळाल्यास तो कुठलाही ऋतू, महिन्यात आपले अस्तित्व दाखवून देतो. विशेषतः गरिबी, दाट लोकसंख्या या घटकांमुळे गोवर प्रादुर्भावाची शक्यता तर वाढतेच पण गोवर होण्याचे होण्याचे वयही कमी झाल्याचे आढळते.
गोवराचे संक्रमण बाधित रुग्णाच्या श्वसनमार्गातून होते. तसेच डोळ्याच्या श्लेष्मपटलद्वारे (conjunctiva) होऊ शकते. अंसरक्षित बालक गोवर झालेलया बालकाच्या संपर्कात आल्यापासून साधारण दहा दिवसांनी त्यास ताप येतो व चौदा दिवसांनी पुरळ येते. हा अधिशयन काळ असतो. (INCUBATION PERIOD
आजाराचे स्वरूप-
संसर्ग झाल्यापासून १० दिवसानंतर ताप, नाक गळणे, शिंका, पडसे, खोकला, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे व कधीकधी डोळ्यांना प्रकाशाचा त्रास होणे अशी लक्षणे दिसतात. उलटी, जुलाब होऊ शकतात. प्रत्यक्ष पुरळ येण्याच्या एक-दोन दिवस आधी गालाच्या आतल्या बाजूस मिठाच्या खड्यासारखे ठिपके दिसतात. ज्यांना कौप्लिक्स स्पॉट म्हणतात. ते सहसा छोटे, टाचणीच्या जाड टोकाहून लहान, निळसर पांढरे, असून लालसर पार्श्वभूमीवर उठून दिसतात.
ताप सुरु झाल्यानंतर दोन-चार दिवसांनी लालसर पुरळ कानापाठी सुरु होऊन ते दोन - तीन दिवसात चेहरा, मान आणि पूर्ण अंगावर पायापर्यंत पसरते. पुरळ काहीसे घामोळ्यासारखे दिसते. तीन - चार दिवसांनी पुरळ आले तसेच निघून जाते. जाताना तपकिरी, तांब्यासारखा रंग सोडून जाते. बालकास त्वचेचा रंग पूर्ववत होण्यास दोन महिने लागू शकतात. ज्या बालकांची प्रतिकारशक्ती कमकुवत असते, त्यांना पुरळ येत नाही. ताप, कौप्लिक्स स्पॉट व वैशिष्ट्यपूर्ण पुरळ असतात लक्षणांवरून निदान करणे शक्य होते. ज्या देशांत गोवर दुर्मिळ आहे तेथे रक्तचाचण्या करून विषाणूचे निदान केले जाते. गोवर होऊन गेल्यानंतर बऱ्याच रुग्णाचे वजन कमी होते व बाळ अशक्त होऊन जाते. कुठल्याही इतर साध्या वाटणाऱ्या संसर्गालाही हे बाळ सहज बळी पडू शकते. बाळाची वाढ खुंटते, जुलाब, बुरशीचे आजार, क्षयरोग, इत्यादी प्रकारचे जंतुसंसर्ग या अवस्थेत होऊ शकतात.
आजारामुळे होणारी गुंतागुंत-
दहापैकी तीन रुग्णांना गोवरामुळे गुंतागुंतीच्या समस्या आढळतात. साधारण कानाचा जंतुसंसर्ग, कानातून पू येणे, स्वरयंत्र व श्वसनमार्गाचा दाह, अतिसार, न्यूमोनिया, मेंदूचा दाह अशा प्रकारची गुंतागुंत होऊ शकते. SSPE या प्रकारचा दुर्मिळ मेंदूविकार क्वचित होऊ शकतो. विशेषतः कुपोषण व 'अ' जीवनसत्वाची कमतरता असल्यास मृत्यूचे प्रमाण ३ ते ४ टक्क्यापर्यंत जाऊ शकते. HIV बाधित बालकांमध्ये मृत्यूदर अधिक असतो. गर्भवती स्त्रीस गोवर झाल्यास गर्भपात व अकाली प्रसूती होऊ शकते. गोवरासाठी विशिष्ट औषध नसून लक्षणानुसार उपचार करावे लागतात. आहार पोषणाकडे विशेष लक्ष द्यावे लागते. बाळ स्तनपान करीत असल्यास तर ते चालू ठेवणे योग्य ठरते. जलसंजीवनीचा वापर करून निर्जलीकरण टाळता येते.
उपाय-
गोवर झालेल्या बालकास 'अ' जीवनसत्वाच्या अतिरिक्त मात्रा द्याव्या लागतात. सहा महिने ते एक वर्षाखालील एक मिलीलिटर (१लाख इंटरनॅशनल युनिटस) तर १ वर्षावरील बाळास २ मिलीलिटर (२ लाख इंटरनॅशनल युनिटस) इतके ‘अ’ जीवनसत्व ‘दिले जाते.
लस-
गोवर प्रतिबंधाचा सर्वात प्रभावी उपाय म्हणजे गोवरची लस. गोवरची लस फक्त गोवर, गोवर-जर्मन गोवर (MR ) व गोवर गालगुंड व जर्मन गोवर (MMR) आणि कांजिण्यासह म्हणजे (MMRV) अशा चार स्वरूपात उपलब्ध आहे. गोवराच्या लसीची पहिली मात्रा ९ महिने पूर्ण झाल्यावर तर दुसरी मात्रा १५ ते १८ महिन्यादरम्यान द्यावी लागते.
गोवर लस-
बाळ नऊ महिन्याचे झाले. की गोवर लसीची पहिली मात्रा देण्यात येते. हे इंजेक्शन स्वरूपात असून ०.५ मिली इतकी मात्रा त्वचेखाली देण्यात येते. त्यानंतर एक दोन दिवस बाळाला ताप येण्याची शक्यता असते.लस मात्र देतानाच बाळासाठी तापाचे औषध देण्याची पद्धत आहे. या तापाची भीती बाळगण्याचे कारण नसते. ही लस अतिशय प्रभावी असते. गोवर रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ९ ते १२ महिने वयोगटातील बाळांना संपर्कात आल्या दिवसातून तीन दिवसांच्या आत लस दिली तर त्यांचे गोवरापासून रक्षण करणे शक्य होते. लस देताना निर्जंतुकीकरण संबंधी पूर्ण काळजी घेण्यात येते. लसकुप उघडल्यावर सहसा तासाभरातच वापरली जाते. तिचे तापमान काटेकोरपणे मध्ये राखले जाते.
१५ ते १८ वयोगटात दुसरी मात्रा देण्यात येते की MMR ची असते. गोवराचे उद्रेक होत असताना संशयित रुग्णांचे पाच दिवस विलगीकरण, रुग्णसंपर्कात आलेल्या बालकांचे दोन दिवसात गोवर प्रतिबंधक लस लसीकरण आणि पूर्ण वस्तीत लसीकरण मोहीम चोख राबवणे या त्रिसूत्रीने गोवरावर नियंत्रण मिळवता येते.
(लेखिका नायर हॉस्पिटलमधील जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत.)