गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत गोवरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. ० ते ५ वर्षे बालकांमध्ये गोवरचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. तर तीन बालकांचा मृत्यु झाल्याचेही निदर्शनास आले असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. यामुळे ९ महिन्यांच्या आणि १६ महिन्यांच्या बालकांचे लसीकरण करावे असे आवाहन पालिकेने केले आहे.
मुंबईत झपाट्याने वाढतोय संसर्ग
मुंबईत गोवरचे ७४० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर काही रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती मिळत आहे. कस्तुरबामध्ये अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहे. एफ/उत्तर विभाग, एच/पूर्व विभाग, एल विभाग, एम/पूर्व विभाग, तसेच पी उत्तर विभागांमध्ये गोवरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात ५० मुलं उपचार घेत असून एक बालक गंभीर आजारी आहे.
गोवरची लक्षणे कोणती ?
गोवरचा धोका हा लहान मुलांमध्ये अधिक आहे. ताप, सर्दी, डोळे लाल होणे ही सामान्य लक्षणे तर आहेतच. तसेच शरीरावर लाल पुरळ दिसणे हे गोवरचे मूळ लक्षण आहे.