मृतदेहाचे आभार मानण्याचा सोहळा, ऐकायला थोडे अवघड वाटेल. पण, हेच सत्य आहे. होय मृतदेहाचा सन्मान सोहळा देशातील काही निवडक वैद्यकीय महाविद्यालयांत आयोजित केला जातो. यावेळी एमबीबीएस अभ्यासक्रमाचे दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी, पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसमोर हा सोहळा आयोजित करतात. याठिकाणी दुसऱ्या वर्षाचे विद्यार्थी त्यांचा शरीरशास्त्र विषयात त्यांना मृतदेह विच्छेदनातून आलेले अनुभव त्यांच्यासमोर विशद करून त्यांच्या आयुष्यात मृतदेहाचे किती महत्त्व आहे, याची सविस्तर माहिती देतात. त्यानंतर प्रातिनिधिक स्वरूपात दोन-तीन विद्यार्थी भाषण करून मृतदेह (कॅडेव्हर) हा विद्यार्थ्यांसाठी प्रथम वैद्यकीय शिक्षक म्हणून असल्याचे सांगतात.
अलीकडेच जे. जे. रुग्णालयाशी संलग्न असलेल्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी त्यांना शवविच्छेदन करताना आलेल्या अनुभवाची आणि त्याद्वारे प्राप्त केलेल्या ज्ञानाची माहिती प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमाला (कॅडेव्हर थॅंक्स गिव्हिंग सेरेमनी), असे म्हणतात. हा कार्यक्रम नवीन विद्यार्थ्यांच्या ‘व्हाइट कोट’ सोहळ्यादरम्यान आयोजित केला गेला होता.
एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला शरीरशास्त्र हा विषय शिकविला जातो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना शवविच्छेदन करून शरीराच्या रचनेची माहिती दिली जाते. या मृतदेहांच्या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीरात प्रत्येक अवयवाची मुळापासून माहिती होते. या व्यतिरिक्त देशातील सर्वच वैद्यकीय महाविद्यालयांत पहिल्या वर्षी शरीररचनाशास्त्र विभागात कॅडेव्हरिक शपथ (ज्याला शवथपथ असेही संबोले जाते) घेतात. ही शपथ एक प्रतिज्ञा आहे, जी विद्यार्थी ज्या मानवी अवशेषांवर ते काम करणार आहेत, त्यांच्या प्रतिष्ठेचा आदर करण्यासाठी करतात. शवविच्छेदनापूर्वी शपथ घेणे ही एक पद्धत आहे. ज्याद्वारे प्रथम वर्षाच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना नैतिकतेच्या मूलभूत घटकांची ओळख करून दिली जाते. या शपथेत त्यांना, तुम्ही माझे पहिले शरीरशास्त्र शिक्षक आहात. या ज्ञानाचा उपयोग मी समाजसेवेसाठी करेन. ज्या उद्देशाने आपले शरीर दान करण्याचे धाडसी कृत्य आमच्या शिक्षणासाठी केले आहे या कृत्याबद्दल मी तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा ऋणी राहीन. या आशयाची शपथ विद्यार्थी घेत असतात.
त्यामुळेच वैद्यकीय विद्यार्थी त्या मृत आत्म्याला पूर्ण आदराने कृतज्ञता व्यक्त करतात. शरीरशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत मृतदेह आणून सर्व विद्यार्थी आदराने नतमस्तक होतात. त्यानंतरच त्याचा उपयोग शिक्षणासाठी केला जातो. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या (एनएमसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोणत्याही मेडिकल कॉलेजमध्ये १५ ते २० विद्यार्थ्यांसाठी किमान एक मृतदेह उपलब्ध असणे गरजेचे आहे. त्या वीस विद्यार्थ्यांची एक बॅच वर्षभर त्या एका मृतदेहावर शिकत असते. टेबलच्या एका बाजूला दहा आणि दुसऱ्या बाजूला दहा विद्यार्थी यावर शिकत असतात. अशा पद्धतीने विद्यार्थी त्या मृतदेहाचे आभार मानून आपल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाचा श्रीगणेशा करत असतात, जी त्यांना त्यांच्या वैद्यकीय व्यवसायासाठी जीवनभर पुरणारी शिदोरी ठरते.