पुरुषांनो! १० तासांपेक्षा जास्त झोपल्यामुळे वाढतो कॅन्सरचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2016 5:19 PM
दीर्घकाळ रात्रपाळी व मग दिवसा अपुरी झोप घेणे आणि रात्री दहा तासांपेक्षा जास्त झोपणाऱ्या पुरुषांना कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते.
सर्व मेहनती आणि आळशी पुरुषांनी लक्ष दिले पाहिजे अशी ही बाब आहे. २४ तासांतून किती तास झोपावे हा तसा जुनाच प्रश्न. सहा ते आठ तास झोपावे असे सांगितले जाते. मात्र जे लोक रात्री झोपले असता दहा तासांपेक्षा जास्त झोपतात त्यांना कॅन्सर होण्याचा धोका वाढतो, असे एका संशोधनातून समारे आले आहे.चीनमधील हुआझाँग युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अँड टेक्नोलॉजी येथील संशोधकांनी केलेल्या अध्ययनात दिसून आले की, दीर्घकाळ रात्रपाळी व मग दिवसा अपुरी झोप घेणे आणि रात्री दहा तासांपेक्षा जास्त झोपणाऱ्या पुरुषांना कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. मध्यमवयीन व प्रौढ २७ हजार चीनी निवृत्त कामगारांच्या सर्वेक्षणाअंती त्यांनी हा निष्कर्ष काढला.प्रस्तुत प्रकल्पात रात्रपाळी, दिवसातील झोप आणि रात्रीची झोप अशा तीन्ही प्रकारच्या झोपेच्या सवयींचा कर्करोगावर स्वतंत्र आणि एकत्रितरीत्या कसा परिणाम होता याचा अभ्यास करण्यात आला. प्रश्नावलींच्या माध्यमातून संशोधकांनी सहभागी लोकांचे तीन गटांत विभागणी केली. ते गट म्हणजे - १. वीस वर्षांपेक्षा अधिक काळ रात्रपाळीत काम केलेले,२. दिवसा झोपण्याची सवय असणारे; आणि ३. रात्री झोपून सकाळी उठणारे यातील पहिल्या गटातील लोकांना कॅन्सर होण्याचा धोका २७ टक्के जास्त होता. तसेच रात्र पाठी करून दिवसा व्यवस्थित झोप न घेणाऱ्या लोकांमध्ये कॅर्करोगाचा धोका दुप्पटीने अधिक असतो. विशेष म्हणजे रात्री झोपूनही नियमित दहा तासांपेक्षा जास्त झोप घेणाऱ्या लोकांमध्येसुद्धा कॅन्सरचा धोका वाढत असल्याचे आढळले.झोप आणि कॅन्सरचा असा परस्पर संबंध केवळ पुुरुषांमध्येच आढळतो. महिलांच्या बाबतीत मात्र तो दिसून येत नाही. वर नमुद केलेल्या झोपेच्या तीन पैकी किमान दोन सवयी जरी एखाद्या व्यक्तीला असतील तर त्यांना कॅन्सर होण्याचा धोका ४३ टक्क्यांनी वाढतो.ज्या लोकांना अशा सवयी नसतात त्यांच्या तुलनेत तर सवयी असणाऱ्या लोकांमध्ये कॅन्सरमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण दुप्पट असते. प्रमाणात आणि शांत झोप घेण्याचे संशोधकांनी आव्हान केले आहे.