- डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com
माणूस हा खरोखर कळपात राहणारा प्राणी आहे. माणूस अनेकदा एकांतात काम करतो; पण जेव्हा त्या कामातून बाहेर येतो तेव्हा त्याला इतरांशी आसुसून गप्पा मारायच्या असतात. आपण काय केलं ते सांगायचं असतं. दुसऱ्यांनी काय केलं, तिसऱ्याचं काय चालू आहे हे ऐकायचं असतं, याचा अर्थ काम करताना एकांत हवा असतो आणि या एकांतात काय काय हुकलं, काय करता आलं नाही, ते सर्व भरूनही काढायचं असतं.
याचं मूळ आपल्या मेंदूत आहे. आपले वंशज जसे कळपात राहणारे होते, तसेच आपणही आहोत. इतरांशी गप्पा मारून, वेगवेगळ्या विषयांवर बोलून, सैरसपाटा करून आल्यावर, इतर कोणाकोणाचा विचार केल्यावर, इतर कोणाकोणाला आठवल्यावर, गाणी गुणगुणल्यावर, नवा-जुना सिनेमा, नाटक पाहिल्यावर, पुस्तकं वाचल्यावर, आवडलेल्या पुस्तकावर इतरांशी चर्चा केल्यावर, अशा अनेकानेक गोष्टी केल्यावर मेंदूत आनंदी रसायनं निर्माण होतात. ही रसायनं मेंदूत हालचाल निर्माण करतात. न्यूरॉन्सच्या नव्या जुळण्या तयार होतात. पूर्वी तयार झालेल्या जुळण्या अधिक ताकदवान होतात.
आता असंही होईल की कोणाला चांगले मित्र, चांगल्या मैत्रिणी, समविचारी गट नसतील आणि त्यांना भेटून त्रासच जास्त होत असेल, तर काय करायचं, असा प्रश्नही निर्माण होत असेल. एकंदरीत अनेक वेळच्या अनुभवांनंतर कोणाला भेटून त्रास होत असेल तर कशाला, कोणाला भेटायला जायचं? त्यापेक्षा आपलं आपण बरं... कोणाला भेटायची गरज नाही, असं वाटू शकतं.
एकांत हाही खूप छान गोष्टी शिकवणारा असतो. स्वत:शी संवाद साधण्यासाठी या वेळेचा नक्कीच उपयोग होतो. मात्र, इतरांना भेटून, अनेकांच्यात मिसळून न्यूरॉन्समध्ये जे बदल होतात, ते सर्वांसाठीच लाभदायक असतात. अशात जर काही मतभेद झाले, वाद झाले तर त्यातूनही शिकण्यासारखं असतंच. अगदी टोकाला गेलं तरी या माणसाशी पुन: वाद घालायचे नाहीत, ही महत्त्वपूर्ण शिकवण तरी मिळतेच.
एकमेकांशी भेटलं की त्या प्रसंगाच्या आठवणी तयार होतात. त्या चांगल्या असोत किंवा वाईट, न्यूरॉन्सला काम मिळणं हे मेंदूतल्या आठवणींच्या भल्याचं असतं!