सांधेदुखी किंवा हाडांना सूज येणे हा आजार बरेचदा वृद्धापकाळाशी निगडित असतो. आर्थ्ररायटिस हे जगभरामध्ये अपंगत्वाचे एक प्रमुख कारण आहे. भारतातील दशलक्षांहून अधिक लोकांवर त्याचा परिणाम होत आहे. मधुमेह, एड्स आणि कॅन्सरसारख्या आजारांच्या तुलनेत आर्थ्ररायटिसचा त्रास जडण्याची शक्यता खूप अधिक असते.
आर्थ्ररायटीसचे ऑस्टिओआर्थ्ररायटिस (ओए) आणि हुमॅटॉइड आर्थ्ररायटिस (आरए) असे दोन प्रकार आहेत. ओए आणि आरए या दोन्हींमध्ये सांधे आणि हाडे दुखतात. मात्र आरए ही एक ऑटोइम्युन स्थिती आहे (शरीर स्वत:वरच हल्ला करते) आणि ओए हा अगदी सर्रास आढळून येणारा प्रकार आहे, ज्यामध्ये तुमच्या सांध्यामध्ये असलेल्या हाडांच्या टोकांना आधार देणाऱ्या कूर्चेची हळूहळू झीज होत जाते. मात्र आर्थ्रराईटिसबद्दल काही गैरसमजुतीही आहेत.त्याचे निराकरण करणे तितकेच गरजेचे आहे. या समजूती पुढीलप्रमाणे:
आर्थ्ररायटिस केवळ म्हातारपणी होतो?आर्थ्ररायटिस हा एक सर्रास आढळणारा आजार आहे, जो कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. तो प्रौढांवर अधिक परिणाम करतो हे खरे असले तरीही हुमॅटॉइड आर्थ्रसाइटिस (आरए)चा त्रास २०-२५ वर्षे वयोगटातील व्यक्तींनाही जडू शकतो.
आर्थ्ररायटिसचे दुखणे म्हणजे सांधेदुखी?हाड तुटणे, जुनाट वेदना, बर्सायटिस आणि दुखापती अशा अनेक कारणांमुळे सांधे दुखू शकतात किंवा अवघडू शकतात. या इतर कारणांमुळे होणा-या वेदना आणि आर्थ्ररायटिस यांच्यामध्ये गल्लत करू नये आणि कोणतेही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आर्थ्ररायटिसवर कोणताच उपाय नाही?आर्थ्ररायटिसवर उपाय शक्य आहे किंवा नाही याचे उत्तर प्रत्येक व्यक्तीगणिक आणि या आजाराशी संबंधित इतर कारणांनुसार वेगवेगळे येऊ शकते. निरोगी राहणे, तंबाखू सेवन टाळणे आणि वेळापत्रक सांभाळणे यामुळे आर्थ्ररायटिस लवकर बळावत नाही आणि स्थिती बिघडण्यास प्रतिबंध होऊ शकतो.
थंड आणि पावसाळी हवामानामुळे आर्थ्ररायटिस अधिकच गंभीर बनतो?हवामान आणि आर्थ्ररायटिसचे बळावणे यांच्यामधीत संबंध सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. मात्र, कमी तापमानामुळे सांध्यामधील द्रवाच्या सांद्रतेवर परिणाम होतो व त्यामुळे सांधे ताठर भासू शकतात असे डॉक्टर सांगतात.
आर्थ्ररायटिसमुळे डोळ्यांवर परिणाम होतो?आर्थ्ररायटिसमुळे होणाऱ्या सांधेदुखीचा डोळ्यांसह शरीराच्या इतर भागांवर परिणाम होऊ शकतो. हुमाटॉइड आर्थ्ररायटिसमुळे डोळे कोरडे होऊ शकतात. डोळ्यांना काही त्रास होत असल्याचे जाणवल्यास तत्काळ डोळ्यांच्या डॉक्टरांची भेट घ्या.