नवी दिल्ली : भारतात विकसित झालेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन (Covishield and Covaxin) या दोन कोरोना लसी (Covid-19 Vaccines) एकत्र करून तयार केलेल्या लसीच्या एकाच डोसमुळे कोरोनाविरोधात मानवाच्या शरिरात उत्तम प्रतिकारशक्ती निर्माण होते, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या संशोधनात आढळून आले आहे. लसीचा मिश्रित डोस कोरोना आणि ओमायक्रॉनच्या B.1.अल्फा, बीटा आणि डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध अधिक प्रतिकारशक्ती देत आहे, असे संशोधनात असे आढळून आले आहे.
एका लसीपेक्षा दोन्ही लसींचे कॉकटेल कोरोनाविरूद्ध अधिक प्रभावी असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. मात्र, अद्याप या संशोधन पेपरचे रिव्ह्यू झालेले नाही. संशोधनानुसार, एक लस घेतलेल्या लोकांमध्ये 6 महिन्यांनंतर अँटीबॉडीज कमी झाले, परंतु ज्या व्यक्तीला कोव्हिशिल्डचा एक डोस आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला, त्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कोणतीही एक लस घेतलेल्या व्यक्तीपेक्षा चांगली दिसून आली.
ICMR ने उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीचे संशोधन केले. ज्याला चुकून कोव्हिशिल्डचा एक डोस आणि कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला. हे संशोधन लसीकरण वेळापत्रक पूर्ण झाल्यानंतर 6 महिन्यांनी करण्यात आला. या संशोधनात लोकांच्या दोन इतर गटांचाही समावेश करण्यात आला, ज्यांनी कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचे दोन्ही डोस घेतले होते. एकाच लसीचे दोन्ही डोस घेत असलेल्या व्यक्तीच्या शरीरात विषाणूच्या स्पाइक प्रोटीनला प्रतिबंध करणार्या IgG अँटीबॉडीमध्ये घट झाल्याचे संशोधनात आढळून आले आहे.
ICMR नवी दिल्लीचे अतिरिक्त महासंचालक डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले की, ज्यांनी लसीचा मिश्र डोस घेतला होता त्यांच्या शरीरात इतर दोन गटांपेक्षा जास्त IgG अँटीबॉडीज होते. ते म्हणाले की, लसीकरणाच्या पहिल्या आणि सहाव्या महिन्यांनंतर तिन्ही गटांमध्ये केलेल्या तुलनात्मक संशोधनात असे आढळून आले की, ज्यांनी लसीचा एक डोस घेतला होता, त्यांच्यामध्ये B.1.अल्फा, बीटा आणि डेल्टा व्हेरिएंट कोरोना आणि ओमायक्रॉनच्या विरोधात अँटीबॉडीज कमी झाल्याचे आढळले.
तसेच, ज्यांनी कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा मिश्र डोस घेतला होता, त्यांच्या शरीरात या सर्व व्हेरिएंटविरुद्ध मजबूत अँटीबॉडीज असल्याचे आढळून आले. याचबरोबर, डॉ. समीरन पांडा म्हणाले की, संशोधनाचा आकार लहान (88 लोकांवर संशोधन) होता. पण यातून दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. एक म्हणजे कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्ही डोस दिलेल्या उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीची चिंता दूर झाली. दुसरे म्हणजे, दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती अधिक दिसून आली.