सध्या जगभरात एका अनोख्या आजाराचं संकट येण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांमध्ये इंग्लंडमध्ये एका आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या आजाराचं नाव 'मंकीपॉक्स' असून हा आजार माकड आणि उंदरांमध्ये या आजाराचे विषाणू आढळून येतो. गेल्या काही दिवसांत इंग्लंडमध्ये या आजाराची लागण झालेले 3 रूग्ण आढळून आले आहेत. सर्वात आधी या आजाराने ग्रस्त असलेले रूग्ण 2003मध्ये अमेरिकेमध्ये आढळून आले होते. तेव्हा या आजाराचे विषाणू गेंबियन प्रजातीच्या उंदरामध्ये आढळून आले होते. त्यानंतर 2017मध्ये नायजेरियामध्ये या आजाराची लक्षणं आढळून आली. आता असं म्हटलं जात आहे की, नायजेरियातूनच या आजाराचे विषाणू एखाद्या रूग्णामार्फत इंग्लंडमध्येही पोहोचले आहेत.
इंग्लंडमध्ये आतापर्यंत तीन लोकांना याचा संसर्ग झाला आहे. डब्ल्यूएचओने सांगितल्यानुसार, मंकीपॉक्स मुख्यतः मध्य आणि पश्चिम आफ्रिकेमध्ये आढळून येतो. नायजेरियामध्ये याचा प्रभाव 2017मध्ये मोठ्या प्रमाणावर दिसून आला होता.
ही आहेत लक्षणं...
मंकीपॉक्स या आजाराची लागण झालेल्या व्यक्तीला ताप येतो. याव्यतिरिक्त डोकेदुखीचाही त्रास होतो. शरीरामध्ये सूज येणं, स्नायूंवर ताण येणं यांसारखा त्रासही होतो. या आजाराने ग्रस्त झालेल्या लोकांची एनर्जीही कमी होते. ताप आल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये शरीरावर लाल पूरळ येतात. याची सुरुवात चेहऱ्यापासून होते. त्यानंतर संपूर्ण शरीरावर हे पूरळ येतात. त्यानंतर या पूरळ जखमांमध्ये रूपांतरित होतात.
या आजारावर उपाय
अद्याप या आजारावर कोणतही औषध किंवा उपचार शोधण्यात आलेलं नाही. लंडनमधील रॉयल फ्री हॉस्पिटलचे डॉक्टर मयकल जॅकब यांनी सांगितल्यानुसार, मंकीपॉक्सने त्रस्त असलेले जास्तीत जास्ती रूग्ण काही आठवड्यांनंतर बरा होतो. लहान मुलांमध्ये या आजाराचे फार गंभीर परिणाम दिसून येत असून त्यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते.