Monkeypox Update : कोरोना महामारीनंतर मंकीपॉक्सच्या साथीने जगातील अनेक देशात थैमान घातले आहे. अनेक देशात मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक झाला असून, भारतात आरोग्य यंत्रणांकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंकीपॉक्स संशयित रुग्णाबद्दल माहिती दिली आहे. हा तरुण मंकीपॉक्सचा उद्रेक झालेल्या देशातून आला असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्सच्या साथीचा सामना करत असलेल्या देशातून एक तरुण रुग्ण आला असून, तो मंकीपॉक्स संशयित रुग्ण आहे. रुग्णाला एका रुग्णालयामध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले असून, त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
रुग्णाला मंकीपॉक्सचा संसर्ग झाला आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी नमुने घेण्यात आले असून, त्याच्या चाचण्या केल्या जात आहेत. काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
मंकीपॉक्सचा संसर्ग कसा होतो?
1)मंकीपॉक्स व्यक्तीशी थेट शारीरिक संपर्क येतांना शरीर द्रव, लैंगिक संपर्क किंवा जखम, घाव यातील स्त्रावाचा संपर्क झाल्यास.
२) मंकीपॉक्स बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपड्यापासून, जास्तीत जास्त वेळ बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास किंवा त्या व्यक्तीच्या श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे इतर व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो.
3) मंकीपॉक्स बाधित प्राणी चावल्यामुळे किंवा बाधित प्राण्याचे मांस न शिजवता खाण्यामुळेही या आजाराचा संसर्ग होऊ शकतो.
मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?
ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजणे, कानामागील, काखेतील, जांघेतील लसिका ग्रंथींना सूज येणे, घाम येणे, घसा खवखवणे आणि खोकला.