Foods for Rainy season: पावसाळ्यात वातावरणात ओलावा असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये पावसासोबत अनेक आजारही डोकं वर काढतात. मलेरिया, डायरिया, ताप, सर्दी-खोकला, इन्फेक्शन अशा अनेक समस्या होतात. पावसाळ्यात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि पचनक्रियाही कमजोर होते. ज्यामुळे इन्फेक्शन आणि आजारांचा धोका जास्त वाढतो.
डायटिशिअन मंजू मलिक यांनी याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्या सांगतात की, पावसाळ्यात वात दोष उत्तेजित होतो आणि सोबतच पित्त दोषही वाढतो. अशात या दिवसात पचनशक्ती कमजोर होते. त्यामुळे या दिवसांमध्ये खाण्या-पिण्याची खास काळजी घ्यावी लागते. या दिवसात काय खाऊ नये हे आज आपण जाणून घेणार आहोत.
हिरव्या पालेभाज्या
पावसाळ्यात हिरव्या भाज्या जसे की, पत्ता कोबी, पालक, चवळीची भाजी, मेथी इत्यादी खाऊ नये. एक्सपर्टनुसार, पावसाळ्यात बॅक्टेरिया आणि फंगस इन्फेक्शनचा धोका वाढतो. पालेभाज्यांमध्ये कीटक आणि बॅक्टेरिया वाढतात. पावसाळ्यात भाज्या खाल्ल्याने पोट खराब होतं. त्यामुळे पावसाळ्यात हिरव्या भाज्या खाणं टाळा.
मांसाहार टाळा
पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने मांस लवकर खराब होतं. या दिवसांमध्ये मास्यांचं प्रजनन होत असतं. त्यामुळे मासे खाऊ नयेत. तसेच चिकन, मटणही लवकर खराब होतं. तसेच पचनशक्ती कमजोर झाल्याने मांस लवकर पचतही नाही ज्यामुळे पोटासंबंधी समस्या होतात.
तळलेले पदार्थ
पावसाळ्यात तळलेले आणि मसालेदार पदार्थ अजिबात खाऊ नये. या पदार्थांमुळे शरीरात फॅट आणि पित्त वाढतं. जे शरीरासाठी नुकसानकारक आहे. अशात समोसे, भजी असे तळलेले पदार्थ खाऊ नये. याने तुम्हाला डायरिया, गॅस, अॅसिडिटी होण्याचा आणि डायजेशन बिघडण्याचा धोका असतो.
सॉफ्ट ड्रिंक
पावसाळ्यात सॉफ्ट ड्रिंक आधीच स्लो झालेल्या पचन तंत्राला कमजोर करतं. तसेच याने शरीरातील खनिजही कमी होतात. त्यामुळे या दिवसांमध्ये लिंबू पाणी, जलजीरा यांचं सेवन करावं. तसेच आल्याचा चहा सुद्धा घेऊ शकता.
उघड्यावरील फळं आणि ज्यूस टाळा
रस्त्यावर मिळणारी फळं बऱ्याच दिवसांचे असतात. त्यावर माश्या, डास इतर कीटक बसतात. सोबतच पावसाचं पाणी त्यांना लागतं. ज्यामुळे आरोग्याचं नुकसान होतं. त्यासोबतच बाहेरचा ज्यूसही या दिवसात पिऊ नये. कारण याने तुम्हाला टायफॉइड, उलटी आणि जुलाब होण्याचा धोका असतो. घरीच फळांचा ताजा रस काढून सेवन करू शकता.