नवी दिल्ली – नवजात बालकांसाठी आईचं दूध सर्वोत्तम आहार आहे असं सरकारकडून वारंवार सांगितलं जाते. मात्र सरकारच्या या आवाहनावर डबाबंद दूध विकणाऱ्या कंपनीचं मार्केटिंग भारी पडलं आहे. WHO आणि UNICEF च्या रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा समोर आला आहे. तो पाहून सर्वांनाच धक्का बसला. WHO नं जवळपास ८ देशांमध्ये केलेल्या सर्व्हेनंतर ही बाब उघडकीस आली आहे.
रिपोर्टनुसार, फॉर्म्युला दूध बाजार खूप विचारपूर्वक केलेल्या षडयंत्रानुसार योजनाबद्ध पद्धतीनं नवजात बालकांच्या आई वडिलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. या कंपनीच्या मार्केटिंगमध्ये आईच्या दुधाला कमी करत बाजारात विक्री होणाऱ्या डबाबंद दूध किती जास्त योग्य आहे हे पालकांच्या मनावर बिंबवत आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुन प्रायोजित रिसर्च प्रकाशित करण्यात आले आहेत. ऑनलाइन हेल्पलाइन बनवण्यात आली. त्याचसोबत डबाबंद दूध प्रमोट करण्यासाठी मोफत पाकिटं वाटली. इतकंच नाही तर डॉक्टर्स, हेल्थ केयर वर्कर्स यांनाही तयार करण्यात आले. जेणेकरुन ते आई-वडिलांना डबाबंद दूध घेण्याचा सल्ला देतील. जगभरात, फॉर्म्युला दुधाचं मार्केट ५५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे, म्हणजेच सुमारे ४१ ट्रिलियन रुपयांची आर्थिक उलाढाल आहे.
‘या’ देशांमध्ये सर्वेक्षण
आता जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि युनिसेफ अनेक देशांच्या सरकारांना, आरोग्य सेवा कर्मचार्यांना आणि बेबी फूड उद्योगाला या मार्केटिंगला लगाम घालण्याचे आवाहन करत आहेत. यासाठी ८५०० पालकांच्या आणि ३०० आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या मुलाखतींच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. बांगलादेश, मेक्सिको, मोरोक्को, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, चीन, युनायटेड किंगडम आणि व्हिएतनाम या आठ देशांमध्ये हे सर्वेक्षण तयार करण्यात आले आहे.
युनायटेड किंगडममध्ये(UK) ८४ टक्के मातांना फॉर्म्युला दुधाची माहिती होती, चीनमधील ९७ टक्के आणि व्हिएतनामच्या ९२ टक्के मातांना फॉर्म्युला दुधाबद्दल सांगण्यात आलं आहे. सर्वेक्षणातील एक तृतीयांश महिलांनी सांगितले की, त्यांना काही आरोग्य सेवा कर्मचार्यांनी ब्रँडच्या नावाखाली फॉर्म्युला दूध विकत घेण्याचा आणि वापरण्याचा सल्ला दिला होता.
‘ब्रेस्टफीडिंग’ला टार्गेट
युनिसेफच्या कार्यकारी संचालक कॅथरीन रसेल यांच्या मते, फॉर्म्युला दुधाबाबत खोटे आणि दिशाभूल करणारे दावे स्तनपानाच्या सवयी बदलू शकतात. आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी स्तनपान हे सर्वोत्तम आहे. मात्र, या प्रकारच्या जाहिरातींचा कसा परिणाम होत आहे, हे जाणून घेण्याचाही या सर्वेक्षणात प्रयत्न झाला.