शाळा-महाविद्यालय परिसरात सर्रास गुटका विक्री
By admin | Published: February 02, 2016 12:15 AM
जळगाव : शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असतानादेखील शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात सर्रास गुटका विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे राज्यात गुटक्यावर बंदी असतानादेखील ही विक्री सुरू असल्याचे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले.
जळगाव : शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असतानादेखील शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात सर्रास गुटका विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे राज्यात गुटक्यावर बंदी असतानादेखील ही विक्री सुरू असल्याचे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गुटका व तत्सम पदार्थांची सवय लागू नये म्हणून शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्यात आली. मात्र तसे चित्र शहरात नसल्याचे दिसून येते. शहरातील बहुतांश शाळा व महाविद्यालय परिसरात पान टपर्या असून तेथे गुटका विक्री होत असली तरी त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष (?) होत आहे. लोकमतने शहरातील काही शाळा व महाविद्यालय परिसरात सर्वेक्षण केले असता दिसून आलेली स्थिती अशी...मूळजी जेठा महाविद्यालय परिसरात महाविद्यालयाच्या समोर असलेल्या टपरीवर सहज गुटका मिळतो. तेथे कोणताही ग्राहक आला की त्याला सहज गुटक्याच्या पुड्या उपलब्ध होतात. या महाविद्यालयाच्या पुढे ए.टी. झांबरे विद्यालय, ओरिऑन स्कूल, गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्या मंदिर या शाळांसमोरही टपर्या असून तेथे गुटका सहज मिळाला. बाहेती महाविद्यालय परिसरा जवळदेखील या पेक्षा वेगळी स्थिती नव्हती. तेथे एका टपरीवर गुटका उपलब्ध झाला. या व्यतिरिक्त प.न. लुंकड शाळा परिसरातही एका टपरीवर गुटका मागितला असता तेथे मिळाला मात्र दुसर्या टपरीवर गुटका नसल्याचे सांगण्यात आले. याशिवाय प्रगती विद्यामंदीर शाळेजवळही हीच स्थिती होती. एस.एन.डी.टी. महाविद्यालयाला लागून टपर्या नसल्या तरी या मार्गावर गुटक्याची विक्री होती. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर कधी कधी हातगाड्या लागलेल्या असतात त्यामुळे तेथे कधी गुटका मिळतो तर कधी मिळत नाही. नूतन मराठा महाविद्यालयासमोर एका टपरीवर गुटक्याची विचारणा केली असता तेथे गुटका नसल्याचे सांगण्यात आले. तसेच आर. आर. विद्यालयाजवळही गुटका नसल्याचे सांगण्यात आले. गुटका बंदीचेच उल्लंघन...तसे पाहता राज्यात गुटका विक्रीवरच बंदी असताना सर्वत्र गुटक्याची सर्रास विक्री सुरू आहे. त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचेच चित्र आहे. केवळ कारवाई...शहर व परिसरात केवळ गुटका जप्त केल्याची अधून मधून कारवाई केली जाते. मात्र गुटका विक्रीवर नियंत्रण आणले जात नसल्याचे शहरात चित्र आहे.