नवी दिल्ली – कोरोना महामारीतून सुरक्षित बाहेर पडलेल्यांपैकी अनेक जणांना आता काळी बुरशी(Black Fungus) आजाराला तोंड द्यावं लागत आहे. देशात अलीकडच्या काळात या रोगाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. काही राज्यांनी काळ्या बुरशीला महामारी घोषित केले आहे. त्यातच आता ज्या लोकांना कोविड झाला नाही अशांनाही काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
ज्या लोकांच्या शरीरात ब्लड शुगर नियंत्रित नाही अशांना काळ्या बुरशीच्या आजाराचा धोका आहे. ब्लॅक फंगस हा एक असा आजार आहे जो कोविड १९ महामारीपूर्वीही अस्तित्वात होता. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या आजाराबाबत शिकवले जाते. मधुमेह(Diabetic) असणाऱ्या लोकांना या आजाराचा संसर्ग होऊ शकतो. अनियंत्रित मधुमेह आणि इतर आजारांचा संसर्ग एकत्र झाल्यास काळ्या बुरशीचा धोका उद्भवू शकतो असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले आहे.
डायबेटिस नियंत्रणात नसेल तर त्या व्यक्तीला काळ्या बुरशीचा आजार होऊ शकतो असं सांगताना डॉ. व्ही. के पॉल म्हणतात की, जर शरीरातील साखरेचे प्रमाण ७००-८०० पर्यंत पोहचते तेव्हा त्याला डायबेटिस केटोसिडोसिस म्हणजे काळ्या बुरशीचा संसर्ग झाल्याचं म्हटलं जातं. हा आजार युवक आणि ज्येष्ठांमध्ये सर्वसामान्य आहे. न्यूमोनियासारख्या आजारांमुळेही हा गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यात आता कोरोनामुळे(Corona) त्याची तीव्रता आणखी वाढली आहे. स्टिरॉइडच्या वापरामुळे परिस्थिती बिघडली आहे. परंतु कोविड नसतानाही खूप कमी प्रमाणात लोकांना म्युकरमायकोसिस(Mucormycosis) आजार होण्याची शक्यता असते असंही डॉ. पॉल म्हणाले आहेत.
तसेच निरोगी लोकांना हा संसर्ग होण्याची काही शक्यता नाही त्यामुळे त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे त्यांना या आजाराचा धोका आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने लोकांच्या रोगप्रतिकारशक्तीवर मोठ्या प्रमाणात हल्ला केला असावा. त्यामुळे कोविड १९ नंतर म्युकरमायकोसिस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याशिवाय दुसऱ्या लाटेत स्टिराईडचा वापर वाढल्यानेही हा धोका असावा. योग्य तपास केल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही असं मत एम्समधील डॉ. निखील टंडन यांनी मांडलं आहे.
रविवारी हरियाणामध्ये ब्लॅक फंगस(Black Fungus) असलेल्या रुग्णांची संख्या ३९८ पर्यंत पोहचली आहे. तर ग्रुरग्राममध्ये १४७ रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये ४ रुग्णांचा काळ्या बुरशीच्या आजाराने मृत्यू झाला आहे. तर उत्तराखंडमध्ये म्युकरमायकोसिस आजाराला महामारी घोषित केलं आहे. मध्य प्रदेशात शनिवारी एका रुग्णाची नोंद झाली आहे. हा आजार योग्य उपचारानंतर बरा होऊ शकतो असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.