- मयूर पठाडेकिती ही धावपळ आणि पळापळ? रोज व्यवस्थित जेवायला तरी तुम्हाला वेळ असतो का? कायम वाघ पाठीशी लागलेला. जेवतानाही हा निवांतपणा आपल्याला लाभत नाही. बकाबका कसं तरी खायचं आणि निघायचं आपल्या कामाला. अनेक जण तर जेवतानाही कामं करत असतं. कोणी मोबाइलवर, कोणी लॅपटॉपवर, कोणी तर जेवतानाही मिटिंग करत असतं. या डिनर किंवा लंच मिटिंगमध्येही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातात. काही मिटिंग्ज तर खास जेवणाच्या वेळातच भरवल्या जातात. कारण त्यातून दोन गोष्टी साध्य होतात. एक म्हणजे अनेक लोकांशी भेट होते. थोड्या गप्पा होतात आणि महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चाही होतात. शिवाय त्यानिमित्त आणखी एक गोष्ट आपसूकच होऊन जाते, ती म्हणजे ‘पार्टी’!पण इंग्लंडच्या संशोधकांनी नुकताच यासंदर्भात एक अभ्यास केला. त्यांचं म्हणणं आहे, एकावेळी एकच गोष्ट करा. मल्टिटास्किंग भलेही तुमच्या करिअरसाठी, तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आवश्यक असेल, पण तुमच्या आरोग्यासाठी ते घातकच आहे. त्यामुळे त्याचं तारतम्य ठेवा.जेवणाची वेळ तर निवांतच असली पाहिजे. भले त्यासाठी तुम्ही कमी वेळ ठेवा, पंधरा मिनिटे, वीस मिनिटे, पण त्या काळात आपल्या इतर गोष्टी बाजूला ठेवा. मल्टिटास्किंग तर अजिबात नको. मिटिंगमध्ये जेवण उरकणं किंवा जेवणाच्या निमित्तानं मिटिंग उरकून घेणं.. यासारख्या गोष्टी तुमच्या अनारोग्याला आमंत्रणच देतात. त्यामुळे तुमचा ताणतणाव आणखी वाढतो. हृदयविकारासारखे आजार जडू शकतात आणि तुमच्या आयुष्यची दोरीही कमजोर होते.जेवणाच्या वेळीही तुम्ही सारखा विचार करीत असाल, त्या वेळेत काम करीत असाल, तर अशा गोष्टी ताबडतोब बंद करा आणि जेवताना केवळ जेवणाचा आस्वाद घ्या. स्वस्थचित्त जेवणाची ही पंधरा मिनिटं तुम्हाला उलट अधिकची एनर्जी मिळवून देईल असं संशोधकांचं म्हणणं आहे.
जेवणाच्या वेळीही तुम्ही करता मल्टिटास्किंग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 7:12 PM
..मग अनेक आजारांना तुम्ही स्वत:हून निमंत्रण देताहात..
ठळक मुद्देजेवणाची वेळ निवांतच असली पाहिजे.भले त्यासाठी तुम्ही कमी वेळ ठेवा, पण त्या काळात मल्टिटास्किंग अजिबात नको.असं करणं म्हणजे अनारोग्याला आमंत्रणच ताणतणाव आणखी वाढतो आणि जडू शकतात हृदयविकारासारखे आजार.