>> डॉ. सतीश उदारे
हा दिवसांपूर्वीची गोष्ट. समोर एक वयस्कर गृहस्थ, सोबत त्यांची पत्नी, मुलगा आणि सून. सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड काळेपणा, डाव्या हातावर लालसर पुरळ उठलेलं. 'अति प्रचंड दुखतयं. हात हलवला तरी दुखतयं आणि नाही हलवला तरीही दुखतयं. डॉक्टर काय आहे?', मी जरा नीट बघितलं 'कधीपासून आहे?', त्यांनी सांगितलं, 'दोन दिवस झालेत पणं दुखतयं चार दिवसांपासून. 'तोपर्यंत काकांच्या हातावरच पुरळ सांगून गेलं 'नागीण' हर्पिस झोस्टर.
'काय नागीण!', म्हणजे कुठेतरी सांगितलेले, वाचलेले आठवले मुलाला. तो म्हणाला, 'म्हणजे आता किती दिवस?'
'काही नाही हो! हा एक विषाणुंनी होणारा रोग आहे. लहानपणी कधीतरी कांजण्या उठलेल्या असतात. ते विषाणू शरीरात राहून जातात. हळूहळू त्याच्या विरुद्धची प्रतिकार शक्ती कमी होत जाते. एक दिवस काहीतरी शारीरिक किंवा मानसिक ताणामुळे एका मज्जातंतूमधून ते बाहेर पडतात. त्वचेवर पुरळ उठतात आणि निघूनही जातात. कधीकधी त्या मज्जातंतूच्या इजेमुळे दुखणे, खाजवणे जास्त होते. पण जीवाला काहीही धोका नाही.'
'काय सांगताय! म्हणजे अगदी साधा रोग आहे. मी तर ऐकल होतं की, ही नागीण जर तोंड जुळवले तर रुग्णाच्या जीवाला धोका असतो. आमची आजी तर असचं म्हणायची.'
बरोबर आहे. कदाचित त्यांच परीक्षण बरोबर असेल. पण नागिणमुळे रुग्ण मरत नाही. पण जास्त प्रमाणात यायचं कारण म्हणजे इतर रोग. उदाहरणार्थ क्षय रोग! काही प्रकारचे कर्करोग किंवा हल्ली अनेकांमध्ये प्रतिकार शक्तीची कमतरता असणे. तसेच एड्स किंवा एचआयव्ही. रूग्ण अशा आजारांनी दगावतो. नागिणीमुळे रूग्ण दगावत नाही, पण औषध बरोबर आणि वेळेवर घेणे गरजेचे आहे. आठवड्याभरात काका उड्या मारत परत येतील.
त्या नागिणीबद्दल गैरसमज आणि अंधश्रद्धाच जास्त. परवा तर कहरच. पेशंटला सांगितल्यावर निवांत वाटलं खरं, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी रुग्ण आणि दोन जण आले, काय तर म्हणे 'डॉक्टर यावर तुमची औषध काम नाही करणार?', म्हटलं का? तर म्हणे, 'शेजारच्याने करणी केल्यामुळे यांना हा रोग झालाय!' आत खरंच मी काय करणार?
थोडक्यात हा रोग 'बॅरिसेल्सा' नावाच्या विषाणुंमुळे होतो. सध्या तर हे विषाणू मारायला चांगली औषधं आहेत. ५ ते ७ दिवस गोळ्या खाल्ल्यावर रोग चटकन बरा होतो. जखमा भरायला थोडासा वेळ लागतो. पहिले दोन दिवस पुरळ यायच्या आधी जिथे पुरळ येणार तिथे खूप दुखतं. अगदी छातीवर आला तर हार्ट अॅटॅकप्रमाणे किंवा पोटावर अॅपेंडीसच्या इन्फेक्शनप्रमाणे. पाणी भरलेले छोटे छोटे पुरळ अगदी एका रेषेत येतात आणि पसरतात अगदी नागिणीप्रमाणे. काही जणांना थोडीशी वेदना होते, तर काहींना खूपच. जेवढं प्रमाण वाढतं, तेवढ्या वेदनाही वाढतात. ही वेदना काही जणांच्या बाबतीत पुरळ बरं झालं, तरी जास्त दिवस राहू शकते. कारण ते मज्जातंतू बरे व्हायला वेळ लागतो. काही जणांना तर अगदी रडवेलं होईपर्यंत दुखू शकतं. पण त्यावरही औषधं आहेत आणि हळूहळू हा प्रकार कमी होतो.
हा कुणालाही होऊ शकतो, पण लहान मुलांमध्ये क्वचित. कारण पहिल्यांदा कांजिण्या येतात हे आपण पाहिलं. तसा हा रोग संसर्गजन्य आहे. ज्यांना कांजिण्या झाल्या आहेत किंवा ज्यांनी त्याची लस टोचून घेतली आहे त्यांना काहीच त्रास नाही. नागिणीच्या रूग्णाकडून दुसऱ्यांना नागीण नाही होऊ शकत, पण कांजिण्या मात्र होऊ शकतात.
कधी त्रास जास्त असेल तर स्रायूंच्या संवेदना नष्ट होऊ शकतात. क्वचित एड्ससारख्या रूग्णांमध्ये हा पसरून मेंदूपर्यंत पोहोचण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या भोवती जर आला तर नेत्रतज्ज्ञाची मदत जरूर घ्यावी. कधी कानात आला तरीही त्रास होऊ शकतो. चेहऱ्यावरील कोणत्याही भागाची विशेष काळजी घ्यावी. थोडक्यात काय तर नागीण या आजाराबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. पण त्या टाळून लवकर आणि योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.
(लेखक हे ज्येष्ठ त्वचारोगतज्ज्ञ आहेत.)