महिला नेहमी आपल्या नखांना सुंदर करण्यासाठी तासंतास वेळ देतात. कधी नेल पॉलिशिंग तर कधी ट्रिमिंग तर कधी नखांच्या शेपिंगमध्ये वेळ घालवतात. पण नखांमध्ये होणाऱ्या छोट्या छोट्या बदलांकडे कुणीही फार लक्ष देत नाहीत. पण नखांमध्ये होणारे हेच बदल तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत खूपकाही सांगत असतात. अशात जर तुम्हाला तुमच्या नखांवर काही डाग दिसत असतील तर वेळीच सावध व्हा कारण हे तुम्हाला आजार होण्याचे संकेत असू शकतात.
पांढऱ्या रेषा
नखांवर असलेल्या पांढऱ्या रेषा किंवा डाग किडनीशी संबंधित आजार आणि शरीरात पोषक तत्वे कमी असण्याची लक्षणे आहेत. ही समस्या अधिक वाढण्याआधी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास तुमचा त्रास वाचू शकतो.
सॉफ्ट नखे
कधी कधी नखे फार सॉफ्ट आणि कमजोर वाटतात, हे लिव्हरमध्ये समस्या असण्याचं किंवा शरीरात आयर्नची कमी असण्याचा संकेत आहे. आयर्नच्या कमतरतेमुळे नखे तुटण्यासही सुरुवात होते.
पिवळी नखे
कधी कधी नखे पिवळी पडतात किंवा फार जाड होतात, त्यासोबतच सतत तुटतही असतात. असे असेल तर समजा की, तुम्हाला फंगल इन्फेक्शनची समस्या आहे. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोमेजलेली नखे
तुमच्या नखांमध्ये शायनिंग नसेल, तर समजून घ्या की, तुम्हाला एनीमियाची समस्या आहे. अशी नखे असणाऱ्यांना डायबिटीज आणि लिव्हरशी संबंधित समस्याही असण्याची शक्यता असते.
काळ्या रेषा- डाग
नखांवर जर काळ्या रेषा किंवा डाग दिसत असतील तर तुम्हाला मेलेनोमा असू शकतो. याप्रकारचे डाग कधी कधी केवळ एका नखावर किंवा पायाच्या बोटांच्या नखांवर दिसतात.
निळे डाग
कधी कधी काहींच्या नखांवर हलका निळा रंग दिसतो, हे शरीराला योग्यप्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने होते. याने तुम्हाला फुफ्फुसाची समस्या होऊ शकते.