सध्या वातावरणातील गारवा वाढला असून खरचं थंडीला सुरुवात झाली, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. वातावरणातील थंडावा आणि शुष्क हवा यांमुळे इन्फेक्शन पसरण्याचा धोका अधिक असतो. हिवाळ्यात रोगप्रतिकार शक्तीदेखील कमी होते. त्यामुळे सर्दी-खोकला, ताप, घशात खवखव, बंद नाक, टॉन्सिल्स यांसारखे आजार होण्याचा धोका वाढतो. या आजारांपासून सुटका करण्यासाठी प्रत्येकवेळी आपण औषधांवर अवलंबून राहतो. पण प्रत्येकवेळी औषधं घेण्याची गरज असतेच असं नाही. तुम्ही काही घरगुती उपायांनीही या समस्यांपासून सुटका करू शकता.
हिवाळ्यात उद्भवणाऱ्या या आरोग्याच्या समस्यांपासून सुटका करून घेण्यासाठी घरात अगदी सहज उपलब्ध होणारं मीठ उपयोगी पडतं. आयुर्वेद तज्ज्ञांनीही या समस्या दूर करण्यासाठी मीठ उपयोगी ठरत असल्याचे सांगितले आहे. नाक, घसा आणि दातांशी निगडीत समस्यांपासून सुटका करण्यासाठी डॉक्टर नेहमी मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याता सल्ला देतात. थंडीमध्ये दररोज रात्री झोपण्यापूर्वी मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे तुम्हाला या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत होते.
असं तयार करा मीठाचं पाणी
एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ एकत्र करून 5 ते 6 वेळा गुळण्या करणं गरजेचं आहे. रात्री असं केल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागण्यासही मदत होईल. तुम्ही या पाण्यामध्ये थोडी हळद आणि लिंबूही मिक्स करू शकता. या पाण्याने गुळण्या केल्यामुळे घशातील खवखव दूर होते. जाणून घेऊया नियमितपणे हे उपाय केल्यामुळे होणाऱ्या फायद्यांबाबत...
1. दातांमधील किडे आणि माउथ अल्सरची समस्या दूर होण्यासाठी
जर दात किंवा हिरड्या दुखत असतील, सूज येत असेल किंवा दातांना किड लागली असेल अथवा कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं असेल तर मीठ आणि गरम पाण्याने गुळण्या केल्यामुळे वेदना आणि सूज दूर होण्यास मदत होते. या पाण्याने गुळण्या करण्यामुळे माउथ अल्सर, जीभ लाल होणं यांसारख्या इतर समस्यांपासूनही आराम मिळतो.
2. दात आणि हिरड्या स्वच्छ करण्यासाठी
मीठ आणि गरम पाण्याने गुळण्या केल्यामुळे घशातील घाणं पूर्णपणे स्वच्छ होते. या पाण्याने गुळण्या केल्यामुळे तोंड पूर्णपणे स्वच्छ होण्यासाठी मदत होते. हे एक प्रकारे माउथ वॉशचे काम करते.
3. सर्दी-खोकला, घशातील खवखव दूर करण्यासाठी
जर सर्दी-खोकला, घशातील खवखव या कारणांमुळे वेदना होत असतील तर मीठ आणि पाण्याने गुळण्या करा. त्यामुळे घसा दुखत असल्यास आराम मिळेल. घशाला आलेली सूज आणि बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते.
4. टॉन्सिल्सची समस्या
टॉन्सिल्स आपल्या शरीरामध्ये पहिल्यापासूनच असतात. आपल्या जीभेच्या मागच्या भागाला चिकटूनच ते असातात. एखाद्या कारणामुळे संक्रमण झाले तर यामध्ये सूज येते. यामुळे फार वेदना होतात. यापासून सुटका करून घेण्यासाठी दररोज सकाळ, संध्याकाळी गरम पाण्याने गुळण्या करणं गरजेचं असतं.
5. तोंडातील पीएच बॅलेन्स करण्यासाठी
अनेकदा डॉक्टर्सही मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचा सल्ला देतात. कारण मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे तोंडातील पीएच लेव्हल बॅलेन्स ठेवण्यासाठी मदत होते. बॅक्टेरियामुळे अनेकदा तोंडातील पीएच लेव्हल डिस्टर्ब होते. या पाण्याने गुळण्या केल्यामुळे ते मेन्टेन ठेवण्यासाठी मदत होते.
6. घसा आणि तोंडामध्ये रक्त प्रवाह सुरळीत होण्यासाठी
घसा, तोंड आणि आसपासच्या अवयवांमध्ये रक्त प्रवाह सुरळीत करण्यासाठी मीठ आणि कोमट पाण्याने गुळण्या करणं फायदेशीर ठरतं. अनेकदा नाक आणि घशामधील इन्फेक्शनमुळे डोकेदुखीसुद्धा होते. असातच पाण्याने गुळण्या केल्यामुळे या समस्या दूर होतात.
7. बंद नाकापासून सुटका
जर तुम्हाला सर्दी झाली असेल आणि त्यामुळे बंद नाकाची समस्या उद्भवत असेल तर यावर मीठाच्या पाण्याने गुळण्या करणं उत्तम उपाय आहे. यामुळे बंद नाकाची समस्या दूर होते. जर सायनसचा त्रास होत असेल तर गुळण्या करणं लाभदायक ठरतं.
8. तापावर परिणामकारक
नियमितपणे मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्यामुळे तापाची लक्षणं कमी करण्यासाठी मदत मिळते. याव्यतिरिक्त मीठाच्या पाण्यामध्ये कापड भिजवून डोक्यावर ठेवा. ताप कमी होतो.