लहान मुलं आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ज्यात एक्सपर्ट पालकांना लहान मुलांसोबत कसे वागावे आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे सांगत असतात. लहान मुलांवर छोट्या छोट्या गोष्टींवरून ओरडू नये हे तर हमखास सांगितलं जातं. जे बरोबरही आहे. अशात आज आम्ही तुम्हाला एक अशी माहिती देणार आहोत जी तुमच्या लहान मुलांसाठी फार महत्वाची आहे.
बरेच लोक वेगवेगळ्या कारणांवरून झोपण्याआधी आपल्या लहान मुलांवर ओरडतात. पण असं करणं फारच जास्त चुकीचं आहे. little_yogini_avani नावाच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून त्यात असं करणं टाळलं पाहिजे याबाबत माहिती दिल आहे.
१) यात सांगण्यात आलं आहे की, झोपेच्यावेळी लहान मुलांचं अवचेतन मन जास्त ग्रहणक्षम असतं. रागाच्या भरात बोलले गेलेले शब्द ते लक्षात ठेवतात. ज्या गोष्टी ते ऐकतात त्याच खऱ्या मानू लागतात.
२) झोपण्याची वेळ ही पालक आणि मुलांमधील संबंध आणखी घट्ट होण्यासाठी चांगली असते. या वेळेत लहान मुलांवर ओरडल्याने विश्वास आणि जवळीकता कमी होते.
३) तुमच्या लहान मुलांवर ओरडून त्यांना भावनिकदृष्ट्या तुमच्यापासून दूर करू नका. त्यांची झोपण्याची वेळ आनंदी ठेवा. कारण झोपेतच लहान मुलांचा विकास अधिक होत असतो.
झोपतेवेळी काय करू शकता?
झोपतेवेळी तुम्ही लहान मुलांना एखादी गोष्टी सांगू शकता. एखादं पुस्तक वाचून दाखवू शकता. जेणेकरून त्यांना चांगली झोप येईल. लहान मुलांना मिठी मारा आणि त्यांच्याशी त्यांनी दिवसभर काय केलं याबाबत बोला. याने तुमच्यातील जवळीक वाढेल आणि त्यांच्या विश्वासही वाढेल.