सध्या भारतात टीबीच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे टीबी (ट्यूबरक्लोसिस) हा आजार दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालला आहे. हा आजार मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबरक्लोसिस किटाणूमुळे होतो. हा किटाणु हवेच्या माध्यमातून एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जाऊ शकतो. जर या आजारावर वेळीच योग्य ते उपाय केले गेले नाही तर हा आजार जीवघेणा ठरु शकतो. टीबीचा प्रभाव थेट फुफ्फुसांवर होत असला तरी हा आजार शरीराच्या कोणत्याही अवयावाला होऊ शकतो.
सध्या टीबीचे निदान करण्यासाठी 'रॅपिड ब्लड टेस्ट'चा वापर करण्यात येतो. परंतु आता टीबी आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी एका नवीन पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. एका नवीन पद्धतीने ब्लड टेस्ट करण्यात येणार आहे. ज्यामुळे टीबीचं निदान करणं आणखी सुलभ होणार आहे. 'द लॅसेंट' जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनातून असा दावा करण्यात आला आहे.
ब्रिटेनच्या नॅशनल हेल्थ केअर (एनएचएस) द्वारे उपयोग करण्यात येणाऱ्या लवकरात लवकरत तपासणी करण्यात येणाऱ्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संशोधनापैकी एक आहे. संशोधनामध्ये 'इम्पीरियल कॉलेज'च्या संशोधकांना असं आढळून आलं की, एखाद्या रूग्णामध्ये टीबीची लक्षणं आढळून आली असतील तर टीबीचं निदान करण्यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर ठरते.
'लॅसेंट इंफेक्शंस डिजीज' जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, दुसऱ्या पिढीच्या नव्या 'रॅपिड ब्लड टेस्ट'वर संशोधन करण्यात आलं. त्यामध्ये असं दिसून आलं की, इतर तपासण्यांच्या तुलनेमध्ये ही टेस्ट अधिक फायदेशीर आहे. संशोधकांच्या मते, या ब्लड टेस्टच्या मदतीने डॉक्टरांना टीबीबाबत कळणं सहज शक्य होत असून त्यामुळे रूग्णांवर ताबडतोब उपचार सुरू करणंही शक्य होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच 'डब्ल्यूएचओच्या ग्लोबल ट्यूबरक्लोसिस रिपोर्ट 2018' हा रिपोर्ट जाहीर करण्यात आला होता. यामध्ये जगभरात गेल्या वर्षभरामध्ये जवळपास एक कोटी लोक टीबीने ग्रस्त झाल्याचे सांगण्यात आले होते. ज्यामध्ये 27 टक्के लोक भारतातीलच होते. या रिपोर्टमध्ये टीबीबाबत अधिक व्यापक आणि नवीन निरीक्षणे नोंदवण्यात आली होती. त्याचबरोबर जागतिक स्तरावर या आजारावर रोख लावण्यासाठी काय पावले उचलण्यात येत आहेत, याबाबतही माहीती देण्यात आली होती.
टीबीची लक्षणं :
टीबीचा उल्लेख झाला की, कमजोरी, खोकला, ताप यांसारखी लक्षणं लोकांच्या मनात येतात. असं समजलं जातं की, रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झालं आहे. पण टीबी केवळ फुफ्फुसाचा आजार नसून टीबीचं इन्फेक्शन शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतं. त्याची काही लक्षणं खालीलप्रमाणे पाहता येतील.
1. श्वास घेण्यास त्रास होणे आणि छातीत दुखणे
2. खोकला आला की उलटी होणे
3. तीन आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त सतत खोकला असणे
4. ताप येणे
5. शरीरात कमजोरी, वजन कमी होणे, थकवा येणे
6. कफ होणे
7. थंडी वाजून ताप येणे
8. रात्री घाम येणे
टीबी होण्याची प्रमुख कारणं :
डॉक्टरांनुसार, या आजाराचं मुख्य कारण अशुद्ध पाणी आणि व्यायाम न करणे हे आहे. चांगला आहार आणि नियमीतपणे व्यायाम केल्यानं तुमची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. तसेच तुमच्या शरीराची बॅक्टेरियासोबत लढण्याची क्षमताही वाढते. त्यासोबतच टीबी होण्याची कारणे खालीलप्रमाणे पाहता येतील.
1. धुम्रपान
2. अल्कोहोल
3. पौष्टीक आहार न घेणं
4. व्यायाम न करणं
5. स्वच्छतेचा अभाव
6. टीबीने ग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात येणं