नवी दिल्ली : चीनच्या वुहानमधील शास्त्रज्ञांनी आता नवीन कोरोना व्हायरस 'निओकोव्ह'बाबत (NeoCoV) भीतीदायक बातमी दिली आहे. 2019 मध्ये वुहानमधूनच कोरोना व्हायरस जगभर पसरला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत कोरोना व्हायरसचा एक नवीन व्हेरिएंट 'निओकोव्ह' आढळला आहे. याचे संक्रमण आणि मृत्यू दर दोन्हीही खूप जास्त आहेत. यामुळे संक्रमित झालेल्या प्रत्येक तीनपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो, असे तेथील शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.
वुहानच्या शास्त्रज्ञांचा हा दावा स्पुतनिक या रशियन वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केला आहे. कोरोनाच्या भीतीने संपूर्ण जग आधीच घाबरले आहे. कोरोनाचा ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटने धूमाकूळ घातला आहे. अशा स्थितीत 'निओकोव्ह' चिंता वाढवू शकतो. 'निओकोव्ह' व्हायरस नवीन नाही, असेही अहवालात म्हटले आहे. हा MERS-CoV व्हारसशी संबंधित आहे. 2012 मध्ये तो मध्य पूर्वेकडील देशांमध्ये सापडला आहे. हा SARS Cove 2 सारखाच आहे, ज्यामुळे मानवांमध्ये कोरोना व्हायरस पसरला होता.
दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांमध्ये 'निओकोव्ह' व्हायरस आढळून आला आहे, तो सध्या फक्त याच पक्ष्यांमध्ये पसरतो, परंतु 'बायोरेक्सिव' वेबसाइटवर प्रीप्रिंट म्हणून प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, तो आणि त्याचे जवळचे स्वरूप PDF-2180-CoV आहे. हा व्हायरस माणसांना देखील संक्रमित करू शकतो.
वुहान युनिव्हर्सिटी अँड चायनीज ऍकॅडमी ऑफ सायन्सेस, इन्स्टिट्यूट ऑफ बायोफिजिक्सचे शास्त्रज्ञ म्हणतात की, 'निओकोव्ह'च्या फक्त एका म्यूटेशन म्हणजे रुप बदल्यानंतर ते मानवी पेशींमध्ये पसरण्यास सुरवात करेल. चिनी संशोधकांच्या मते, 'निओकोव्ह' मध्ये उच्च संसर्ग दर गाठण्याची क्षमता आहे आणि प्रत्येक तीन संक्रमितांपैकी एकाचा मृत्यू होऊ शकतो.
रशियामधील व्हॉयरोलॉजी अँड बॉयोटेक्नॉलॉजी विभागाने गुरुवारी 'निओकोव्ह' संदर्भात एक निवेदन जारी केले. यात म्हटले आहे की, सध्या 'निओकोव्ह' मानवांमध्ये सक्रियपणे पसरण्यास सक्षम नाही. नवीन कोरोना व्हायरस मानवांमध्ये पसरतो की नाही, हा सध्या प्रश्न नाही. तर त्याच्या जोखीम आणि क्षमतांबद्दल अधिक अभ्यास आणि तपासणी करण्याचा आहे.